scorecardresearch

नवी मुंबई : सानपाडा कांदळवनात संशयास्पद आग…हतबल अग्निशमन दल

काही वर्षापूर्वी वाशी-करावे-सानपाडा लगत असलेल्या या वनात आगी लागण्याच्या घटना वारंवार घडत होत्या.

नवी मुंबई : सानपाडा कांदळवनात संशयास्पद आग…हतबल अग्निशमन दल
नवी मुंबई : सानपाडा कांदळवनात संशयास्पद आग…हतबल अग्निशमन दल ( Image – लोकसत्ता टीम )

नवी मुंबई : नवी मुंबईच्या खाडी किनारी असलेल्या विस्तीर्ण कांदळवनात लागणाऱ्या आगीचे सत्र पुन्हा सुरु झाले की काय? अशी शंका पर्यावरण प्रेमी व्यक्त करीत आहेत. गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान सानपाडा मोराज सर्कल लगत असलेल्या कांदळवनात आग लागली होती.आग लागल्याच्या ठिकाणी अग्निशमन पथकाला जाता आले नाही. सुमारे तीन तासांनी आग विझली आणि पहाटे पर्यत धूर दिसत होता. मात्र आग कोणी लावली ? याचे कारण नेहमी प्रमाणे गुलदस्त्यात आहे.

नवी मुंबईला विस्तीर्ण खाडी किनारा असून कांदळवन क्षेत्रही मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी फ्लेमिंगोंसह अनेक विदेशी पक्षांचा मुक्त वावर असतो, तसेच अनेक देशी पक्षांचा अधिनिवास याच वनात आहे. काही वर्षापूर्वी वाशी-करावे-सानपाडा लगत असलेल्या या वनात आगी लागण्याच्या घटना वारंवार घडत होत्या. या ठिकाणी आग लावल्याशिवाय आग लागणे शक्य नाही असे मत वेळोवेळी वन विभाग आणि अग्निशमन विभागाने व्यक्त केले होते. आता गुरुवारी पुन्हा आग लागल्याने हे सत्र सुरु झाले की काय अशी शंका उपस्थित होत आहे. रात्री आठच्या सुमारास सानपाडा लगत कांदळवनात आग लागली. ही आग येथून सुमारे दोन किलोमीटर वरील एका उंच इमारतीतून पर्यावरणासाठी काम करणारे बाळासाहेब शिंदे या सजग नागरिकाला दिसल्याने त्यांनी वाशी अग्निशमन दलास कळवले. अग्निशमन दलही काही वेळात या ठिकाणी पोहचले मात्र त्यांनी दाट वन असल्याने आगी पर्यत जाता आले नाही. त्यामुळे ते पथक परतले. अशी माहिती वाशी अग्निशमन विभागाने दिली.

हेही वाचा… कार्बन न्युट्रल मोहिमेकडे नवी मुंबई शहराची वाटचाल; शहरात कार्बन ऑडिटचे काम सुरू

हेही वाचा… नवी मुंबई : शिष्यवृत्ती फार्म ऑफलाईन बंद; ऑनलाईनसाठीही समस्यांचा डोंगर

आगीची माहिती अग्निशमन विभागास दिली त्या बाळासाहेब शिंदे यांनी माहिती देताना सांगितले की एवढ्या आत वन्य पक्षीप्राणी आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांशिवाय जाणे कोणीही अपेक्षित नाही. मात्र उंचावरून पाहिल्यास आग लागलेल्या परिसरात एक झोपडी दिसली. हिवाळ्यात थंड हवेत आणि शांत वातावरणात एवढ्या आत आग लागणे हे संशयास्पद आहे.या बाबत वन विभागाने योग्य ती दखल घ्यावी हीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-01-2023 at 09:59 IST

संबंधित बातम्या