तीन दिवसांत महापालिकेला संच मिळणार
नवी मुंबई : शहरात करोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी येत्या काळात एक लाख ६० हजार नागरिकांच्या चाचण्या घेण्यास पालिका प्रयत्नशील असल्याची माहिती पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
नवी मुंबईत बाधितांची संख्या ८०७२ झाली आहे, तर आजवर २६० जण मृत्युमुखी पडले आहेत.
मुंबईप्रमाणेच चाचण्यांची गती वाढवून रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यावर नवी मुंबई पालिकेने भर दिला आहे. यासाठी राज्य शासनाकडे एक लाख नागरिकांसाठी जलद चाचणीसाठीची मागणी केली आहे. याशिवाय खासगी कंपनीकडून पालिकेने चाचण्यांसाठी आवश्यक ६० हजार संच मागवले आहेत.
रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या तसेच अतिजोखमीच्या संशयिताच्या चाचण्या तातडीने झाल्यास आणि चाचणी अहवालही मिळाल्यास संसर्ग रोखण्यासाठी मदत होते. यासाठी पालिकेने राज्य सरकारकडे जलद चाचणी संचाची मागणी केली आहे. मात्र, सद्य:स्थितीत शहरात चाचण्या सुरू करण्यासाठी खासगी कंपन्यांकडून चाचणी संच मागविण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.
संशयिताच्या एका बोटाच्या रक्ताचा नमुना घेऊन १५ ते २० मिनिटांत अहवाल प्राप्त करण्याबद्दल पालिका प्रयत्नशील आहे. नवी मुंबईत आजवर फक्त दीड टक्का चाचण्या केल्या जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पालिका हद्दीतील चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी खासगी प्रयोगशाळांची मदत घेण्यात येत आहे. याशिवाय जलद चाचण्यांसाठी सरकारकडे एक लाख जलद चाचणी संचाची मागणी करण्यात आली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत चाचणीचे संच प्राप्त होतील.
– अण्णासाहेब मिसाळ, नवी मुंबई पालिका आयुक्त
