साधारणत: उन्हाच्या कडाक्यात सुकलेल्या झाडांच्या फांद्यामध्ये घर्षण होऊन वणवा पेटला जातो, असे सांगितले जाते. परंतु उरण आणि पनवेल परिसरात जंगल परिसरात हिवाळ्यातील थंडीच्या दिवसांतही हे वणवे पेटू लागल्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे वणवे विझविण्यासाठी वनविभागाकडे आवश्यक साधनसामुग्री नसल्याने या वणव्यामुळे भविष्यात ही जंगले नष्ट होण्याची भीती पर्यावरण मित्रांनी व्यक्त केली आहे.
सध्या उरण आणि पनवेलमध्ये वाढते औद्योगिकीकरण सुरू आहे. औद्योगिकीकरण वाढीसाठी जागांची उपलब्धता व्हावी यासाठी उद्योजकांनी जंगलांकडे आपला मोर्चा वळविला आहे. त्यामुळे हेतुपुरस्सर वणवा लागण्याचा घटना घडत आहेत. उन्हाळ्यात लागणारे डोंगर व जंगलातील वणवे आता हिवाळ्यात लागू लागल्याने त्याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. या वणव्यात वन्यजीव व प्राण्यासह येथील शेतकऱ्याचेही नुकसान होत आहे. जंगलात आग लागल्यानंतर ती विझविण्यासाठी वन विभागाकडे साधनसामुग्री उपलब्ध नसल्याने अधिक नुकसान होत आहे. वणवा येथील जमिनी खाली करण्यासाठीच लावण्यात आला असावा, असा संशय निसर्ग मित्र संघटनेने व्यक्त केला आहे.
मागील रविवारी उरणमधील मोरा डोंगरावर तर मंगळवारी रात्री गव्हाण फाटाजवळील डोंगरावर वणवा लागल्याची घटना घडली आहे. उरणच्या चिरनेर, कळंबुसरे व वशेणी परिसरात वणवा लागल्यानंतर आग विझविण्यासाठी गेलेल्या वनसंरक्षकांकडे केवळ काही गोणपाटे व झाडांच्या फांद्या याचाच वापर केला जात होता. त्यामुळे आग विझविण्यात उशीर झाल्याने जंगलात अधिकच आग भडकली होती. २०१३ मध्ये अशाच प्रकारचा वणवा चिरनेर परिसरात लागला असता काम करून जंगलातच विश्रांती घेणाऱ्या एका वृद्ध महिलेचा जळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
या संदर्भात उरण वन विभागाचे वनसंरक्षक चंद्रकांत मराठे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र वनविभागाकडे मनुष्यबळ तसेच वणवा लागल्यानंतर आग विझविण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची वानवा असल्याचे अनेक घटनात सिद्ध झाले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Nov 2015 रोजी प्रकाशित
उरण, पनवेलमध्ये हिवाळ्यातही वणवा
साधारणत: उन्हाच्या कडाक्यात सुकलेल्या झाडांच्या फांद्यामध्ये घर्षण होऊन वणवा पेटला जातो.
Written by मंदार गुरव
Updated:
First published on: 19-11-2015 at 00:05 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Temperature increase in navi mumbai