पनवेल – थायलंड येथून तस्करीने आणलेला हायड्रो गांजा खारघरमध्ये बाळगणा-या एका तरूणास नवी मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. या तरूणाच्या दोन साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत. 

काही महिन्यांपूर्वी नवी मुंबईमध्ये परदेशातून हायड्रो गांजाच्या तस्करीच्या एका प्रकरणाने शहर हादरून गेले होते. पुन्हा असेच एक प्रकरण गांजा बाळगणा-या एका तरूणाला पकडल्यानंतर उजेडात आले आहे. अंमलीपदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख संदीप निगडे यांनी गुरुवारी रात्री केलेल्या कारवाईत हे प्रकरण चर्चेत आले. 

पोलिसांना खारघर येथील सेक्टर १९ येथील उद्याणासमोरील एका इमारतीमध्ये अंमली पदार्थ असल्याची माहिती मिळाल्यानंतर २९ वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली. या तरूणाजवळच्या मोटारीची झडती घेतल्यावर त्याच्याकडे ८०० मिलीग्रॅम वजनाचा हायड्रो गांजा सापडला. तसेच प्लास्टीक पिशव्या, गांजा बारीक करण्यासाठी क्रशर, आणि वजनकाटा पोलिसांना सापडला. पोलिसांनी या तरूणाकडे अधिक चौकशी केल्यावर धक्कादायक बाब समोर आली. 

अटकेत असलेल्या तरूणाच्या दोन मित्रांनी त्याला हा गांजा विक्रीसाठी दिला असून या दोन मित्रांनी थायलंड देशातून छुप्या मार्गाने (सीमाशुल्क विभागाला लपवून) त्याची तस्करी केल्याचे समोर आले. पोलीसाचे खास पथक सध्या त्या दोन तरूणांचा शोध उलवे आणि मुंबई येथील उपनगरामध्ये घेत आहेत.

थायलंड आणि अमेरीका या देशांमध्ये हायड्रो गांजावर निर्बंध नाहीत. त्यामुळे पोस्ट आणि सीमाशुल्क विभागाच्या माध्यमातून तो भारतात कुरीयर मार्फत पाठविला जातो. जून महिन्यात नवी मुंबई पोलिसांनी हायड्रो गांजाच्या अशाच एका तस्करी आणि विक्री प्रकरणी सलग २० जणांवर कारवाई केली. या प्रकरणी पोस्ट आणि सीमाशुल्क विभागाच्या उच्च अधिका-यांवर गुन्हे नोंद केले. तसेच नवी मुंबईच्या दोन पोलिसांचा सहभाग या तस्करीत आढळल्याने त्यांना सुद्धा बडतर्फ केले होते. या तस्करीमध्ये उच्चशिक्षित तरूणांच्या सहभागामुळे पालकांसह पोलिसांची झोप उडाली आहे.