ठाणे-बेलापूर मार्गावरील कोंडी फुटण्याची चिन्हे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडीपासून वाहनचालकांची कायमची सुटका व्हावी यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) वतीने घणसोली-तळवली आणि कोपरी येथे बांधण्यात येणारे दोन उड्डाणपूल आणि महापे येथील भुयारी मार्गाचे काम मुदतीपूर्वी पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. एमएमआरडीएच्या सूत्रांनी ही माहिती दिली. या कामासाठी दोन वर्षांची मुदत देण्यात आली होती. काम सुरू होऊन नऊ महिने झाले असून येत्या आठ-नऊ महिन्यांत उर्वरित काम पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

ठाणे-बेलापूर हा आता सर्वाधिक रहदारीचा मार्ग झाला आहे. पूर्वी ५० ते ६० हजार वाहनांची रहदारी असणाऱ्या या मार्गावर आता एक लाखांपेक्षा जास्त वाहनांची ये-जा सुरू झाली आहे. साहजिकच मार्ग अपुरा पडू लागला असून ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या सतावू लागली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी या मार्गावरील गावांच्या वेशीवर उड्डाणपूल बांधण्यात यावेत, यासाठी नवी मुंबई पालिकेने एमएमआरडीएला प्रस्ताव सादर केला होता. शिळफाटा मार्गावर महापे येथे उड्डाणपूल उभारणाऱ्या एमएमआरडीएने हा प्रस्ताव मान्य करून १५२ कोटी ४० लाख रुपये खर्चाचे दोन उड्डाणपूल आणि एक भुयारी मार्ग बांधण्याचे काम गेल्या वर्षी सुरू केले आहे. तळवली आणि घणसोली या दोन गावांच्या वेशीवर खूप मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने या त्यांना जोडणारा एकच उड्डाणपूल बांधला जात आहे. या दोन्ही उड्डाणपुलांचे खांब उभारण्याचे काम जवळपास पूर्णत्वास आले असून आता तयार तुळई बसविण्यात येणार आहेत.

[jwplayer 5i2fQEnk]

या मार्गावर असलेली प्रचंड वाहतूक पाहता बांधकाम कंपनीला दोन वर्षांची मुदत देण्यात आली होती, मात्र नवी मुंबई पालिकेने बांधलेले सेवा रस्ते आणि एमआयडीसीतील सिमेंट-क्राँक्रीटचा मार्ग यामुळे समस्येची तीव्रता कमी झाली. या भागातून होणारी अवजड वाहतूक पालिकेच्या मार्गावरून वळविण्यात आली. त्यामुळे बांधकाम कंपनीला उड्डाणपुलाचे काम करणे सोपे झाले आहे. परिणामी पुढील वर्षी वाहतुकीस खुले होणे अपेक्षित असलेले हे उड्डाणपूल वर्षांअखेरीसच सेवेसाठी सज्ज करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे.

महापे भुयारी मार्गही लवकरच

महापे येथील भुयारी मार्गासाठी ठाणे-बेलापूर मार्गाचे काँक्रीट खोदण्यात आले होते. हा भुयारी मार्गही लवकरच खुला केला जाणार आहे. पावणे येथील ‘सविता केमिकल्स’ या रासायनिक कारखान्याजवळ दुसरा उड्डाणपूल बांधला जात आहे. त्याचेही काम प्रगतिपथावर आहे. या संदर्भात एमएमआरडीएचे प्रकल्प अभियंता विनय सुर्वे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

[jwplayer ZL8IBmbt]

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane belapur traffic problem
First published on: 03-02-2017 at 00:18 IST