ठाणे : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा शुभारंभ सोहळा लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारसाठी हा अत्यंत महत्वाचा सोहळा मानला जात आहे. लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्यापुर्वी याच भागात असलेल्या अटल सेतूचा शुभारंभ सोहळा दणक्यात आयोजित करत असताना तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सोहळ्यावर राम मंदिर शुभारंभ सोहळ्याची छाप कशी राहील याची पद्धतशीरपणे काळजी वाहीली होती. मुंबईसह राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागल्याने या पार्श्वभूमीवर होणाऱ्या नवी मुंबई विमानतळाचा शुभारंभ सोहळा अनेक अंगाने चर्चेत आला आहे.
दरम्यान या विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे यासाठी आगरी-कोळी भूमीपुत्र समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. मध्यंतरी शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार बाळ्या मामा यांनी एक बाईक रॅली काढत या समाजातील भावनांना वाट करुन दिली. यामुळे भाजपचे स्थानिक नेते कमालिचे सावध झाले असून या मुद्दयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची तयारी केली जात आहे.
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने यापुर्वीच केंद्र सरकारला पाठविला आहे. अटल सेतूच्या शुभारंभ सोहळ्याच्या निमीत्ताने नवी मुंबईत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाजपच्या स्थानिक नेत्यांनी दि.बा.पाटील यांच्या नामकरणाची आठवण करुन देण्याचा प्रयत्न केला होता. तसेच मध्यंतरी तत्कालिन केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांचीही या नेत्यांनी भेट घेतली होती. असे असताना अजूनही विमानतळाच्या नामकरणाविषयी स्पष्टता आलेली नाही. विमानतळाचा उद्धाटन सोहळा जसा जवळ येतो आहे तशी यासंबंधीची मागणी अधिक तीव्र स्वरुपात पुढे येऊ लागली आहे.
ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील आगरी-कोळी समाज तसेच भूमीपुत्रांमध्ये यासंबंधीच्या तीव्र भावना आहेत. मुळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना भाजपच्या स्थानिक नेत्यांनी यासंबंधीचे आंदोलन हाती घेतले होते. त्यास भाजपच्या राज्य पातळीवरील नेत्यांची उघड साथ असल्याचेही स्पष्ट होते. असे असताना अजूनही नामकरणाचा मुद्दा मार्गी लागत नसल्यामुळे भाजपचे स्थानिक नेते अस्वस्थ बनले आहेत.
बाळ्या मामा यांच्या आंदोलनामुळे भाजप सावध?
मध्यंतरी शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार बाळ्या मामा यांनी भिवंडी ते विमानतळ अशी बाईक रॅली काढत दि.बा.पाटील यांच्या नामकरणाचा मुद्दा जोरदारपणे लावून धरला. या आंदोलनास ठाणे, रायगड जिल्ह्यातून मोठया संख्ये आगरी-कोळी समाजाचे नागरिक उपस्थित राहीले होते. या आंदोलनास भाजपचे स्थानिक नेते आले नाहीत. असे असले तरी दोन दिवसांपुर्वीच लोकनेते दि. बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीची एक बैठक संपन्न झाली. या बैठकीला समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, माजी केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, खासदार संजय पाटील, खासदार सुरेश म्हात्रे, लोकनेते दि. बा. पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील, माजी आमदार सुभाष भोईर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, संतोष केणे, जगदीश गायकवाड यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या बैठकीत नवी मुंबईत पहिले विमान उतरतानाच लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाची उद्घोषणा व्हावी, अशी आग्रही भूमिका मांडण्यात आली. सविस्तर चर्चेअंती बैठकीत असा निर्णय घेण्यात आला कि, या मागणीसाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भूमिपुत्रांच्या तीव्र भावनांची दखल घेऊन, विमानतळाच्या उद्घाटनापूर्वीच लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाची घोषणा व्हावी, अशी विनंती केली केली जाईल. तसेच मुख्यमंत्री महोदयांकडे मा.पंतप्रधान कार्यालयाकडे देखील या मागणीसाठी पाठपुरावा करण्याची विनंती केली जाईल. भेट घेतल्यानंतर, आठ दिवसांनंतर कृती समितीची पुन्हा बैठक होईल आणि त्या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.