नवी मुंबई : महाराष्ट्र शासनाने नुकतेच डीपीएस तलाव संरक्षित राखीव क्षेत्र घोषित केल्यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. डीपीएस तलावातही फ्लेमिंगो येऊ लागले असताना या परदेशी पाहुण्यांची पामबीच किनारी असलेल्या ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरालाही फ्लेमिंगोंची पसंती पाहायला मिळत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो अधिवास करू लागले आहेत.
ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात सकाळी तसेच सायंकाळी मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगोंचे दर्शन होऊ लागले आहे. त्यामुळे बच्चेकंपनींसह पर्यावरणप्रेमी सुखावले असून शहराच्या सौंदर्यात आणखी भर पडत असल्याचा आनंद नागरिकांनी व्यक्त केला आहे.
नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ भारत तसेच माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून नेरुळ पामबीच मार्गाला लागून असलेल्या १३७ एकरच्या भूखंडावर ज्वेल ऑफ नवी मुंबई विकसित केले आहे. यात ६४ एकर जागेवर होल्डिंग पॉन्ड तसेच ८ एकर जागेवर नैसर्गिक तलाव तसेच १४ एकरवर वॉकिंग ट्रॅक आणि याच परिसरात ३५ एकर जागेवर देशातील सर्वात मोठे मियावाकी जंगल उभे केले आहे.
शहरात डीपीएस तलाव, टी एस चाणक्य, एनआरआय तलावात हजारो फ्लेमिंगोंचे आगमन होते. आता ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरातही फ्लेमिंगोंचा वावर वाढला आहे. ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरातही फ्लेमिंगोेंचे दर्शन होत असल्याने पर्यावरणप्रेमी, नागरिक सुखावले आहेत.
ही आनंदाची पर्वणी….
नवी मुंबई शहराला फ्लेमिंगो सिटी संबोधले जात असताना याचे ब्रॅंडिग सिडको व पालिका यांनी करोडो रुपये खर्च करून केले आहे. परंतु आता याच फ्लेमिंगोंचा अधिवास नष्ट करण्याच्या विरोधात पर्यावरणप्रेमी एकवटले असून त्यांच्या प्रयत्नांमुळे व वनमंत्री गणेश नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीपीएस तलावाला संरक्षित राखीव क्षेत्र घोषित केल्याचा आनंद आहे.
एनआरआय, डीपीएस, टी एस चाणक्य तसेच ज्वेल ऑफ नवी मुंबई येथेही फ्लेमिंगो येत आहेत ही नवी मुंबईकरांसाठी आनंदाची गोष्ट आहे. फ्लेमिंगो पाहण्यासाठी अनेक लोक येत आहेत. या फ्लेमिंगोंच्या आगमनामुळे शहराच्या सौंदर्यातही भर पडत आहे. – सुनील अग्रवाल, पर्यावरणप्रेमी