नवी मुंबई: नवी मुंबईत छोट्या मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. चोरटे एवढे निर्ढावले आहेत कि पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एका गाडीची काच फोडून आतील पाच लाख रुपयांची रोकड चोरी झाली आहे. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबईत सराईत चोर तसेच भुरट्या चोरीचे प्रमाणात वाढ झाली आहे. याची गंभीर पणे दखल घेत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी अशा चोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे. या पथकाची स्थापना करून अवघा आठवडा हि उलटला नाही तोच वाशी पोलीस ठाण्यापासून ५० फुटांच्या अंतरावर वर्दळीच्या रस्त्यात चोरीची घटना घडली आहे.
शनिवारी संध्याकाळी पावणे सात वाजता व्यवसायाने वकील असलेले शुभेन्दू पटनाईक यांनी वाशी पोलीस ठाणे नजीक नवी मुंबई स्पॉट्स असोसिएशन समोर कार पार्क केली. काही वेळाने या ठिकाणी दुचाकीवर दोन व्यक्ती आले त्यांनी गाडीच्या मागची काच फोडून आतील ५ लाखांची रोकड चोरी करून पलायन केले. पटनाईक काम संपवून गाडी जवळ आल्यावर त्यांना फुटलेली काच दिसली व चोरीचा प्रकार उजेडात आला. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात अनोळखी दोन व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.