ऐरोली सेक्टर १९ ते ठाणे-बेलापूर मार्गे वळणरस्ता असलेल्या दोन किलोमीटरच्या पटनी मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. तुरळक वाहतूक असणाऱ्या या मार्गावर मुंब्रा बाह्य़वळण मार्ग बंद केल्यापासून ऐरोली खाडीपुलावरून येणारी वाहने वळविण्यात आली आहेत. त्यामुळे रस्त्याची अवस्था आणखी बिकट झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाच ते सहा फूट लांब-रुंद आणि दोन ते अडीच फूट खोलीचे अनेक खड्डे या मार्गावर आहेत. गणेशोत्सव जवळ आला तरी या मार्गाची दुरुस्ती कोणी करायची हा वाद कायम असल्याने आता पालिका खड्डे बुजवण्यासाठी सरसावली आहे.

नवी मुंबई पालिकेच्या अखत्यारितील अंर्तगत रस्याची दुरवस्था झाली आहे. रबाळे, तळवळी, घणसोली या भागांतील अंतर्गत रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज पसरले आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतरही या मार्गाची दुरुस्ती झालेली नाही. ऐरोली सेक्टर १९ ते विटावा गावाजवळील ठाणे-बेलापूर मार्गापर्यंतच्या पटनी मार्गाची दुर्दशा झाली आहे. हा मार्ग एमआयडीसीच्या अखत्यारित असल्याने पालिका तो दुरुस्त करत नाही; तर पालिकेची जबाबदारी म्हणून एमआयडीसी लक्ष देत नाही.

या मार्गाला कोणी वाली नसल्याचे चित्र आहे. या दोन प्राधिकरणांच्या वादात या छोटय़ा मार्गावर खूप मोठे खड्डे पडले आहेत. एखादी मोटारसायकल या खड्डय़ांत आडवी राहील एवढे मोठे खड्डे पडले आहेत. या कमी क्षमता असलेल्या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक दिवस-रात्र सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर अधिक खड्डे पडत आहेत.

गणेशोत्सवापूर्वी शहरातील सर्व खड्डे बुजवण्याच्या सूचना अभियंता विभागाला दिल्या असून शीव-पनवेल मार्गावरील खड्डय़ांसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. पटनी मार्गाचा वाद नंतर सोडविण्यात येईल, पण गणेशोत्सवापूर्वी पालिका या रस्त्याची दुरुस्ती हाती घेत आहे.

– जयवंत सुतार, महापौर, नवी मुंबई.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: To build a pothole on patni road
First published on: 30-08-2018 at 03:06 IST