नवी मुंबई – राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील (एपीएमसी) माथाडी कामगार, मापाडी, व्यापारी गोदरा रोडवे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी वर्गाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी ४५ लाख १० हजारांचा निधी जमा करण्यात आला आहे.
राज्यात काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे मराठवाड्यासह विविध भागातील शेतकऱ्यांची शेती वाहून गेली. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नुकतेच राज्य सरकाने शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. त्याचप्रमाणेअनेक संस्था आणि विविध माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जात आहे. दरम्यान आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यापाऱ्यांना आवाहन केले होते.
एपीएमसीतील कामगार, व्यापारी, माथाडी व गोदरा रोडवे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बांधवांनी ही मदत केली आहे. यामध्ये फळ बाजारातून २८ लाख रूपये, घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघ बाजारातून ८ लाख १० हजार, अन्नधान्य मार्केट मर्चंट असोसिएशन ग्रोमा ५ लाख, कांदा-बटाटा बाजार ३ लाख, गोदरा रोडवे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बलविंदर सिंग चौधरी यांच्याकडून १ लाख रूपयांची मदत करण्यात आली आहे. अशा प्रकारे एकूण ४५ लाख १० हजार रूपयांची मदत करण्यात आली आहे.
यासोबतच शेकडो टन अन्नधान्य आणि आवश्यक वस्तू पूरग्रस्त भागात पाठविण्यात आल्या. ज्या शेतकऱ्यांच्या कष्टावर आपली बाजारपेठ चालते, त्या शेतकऱ्यांवर संकट आल्यावर त्यांच्या पाठीशी उभे राहणे ही आपली जबाबदारी आहे. एपीएमसी परिवाराने हे उत्तम उदाहरण घालून दिले आहे असे मत आमदार मंदाताई म्हात्रे यांनी व्यक्त केले. यावेळी आमदार शरद सोने, घाऊक भाजीपाला व्यापारी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शंकर पिंगळे, कैलास ताजणे, बाळासाहेब साळुंखे, बाळासाहेब भिडे, कांदा-बटाटा व्यापारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे राजू मणियार आणि ग्रोमा हाऊसचे अध्यक्ष भीम भानुशाली, उपाध्यक्ष अमृतलाल जैन, सचिव निलेश वीरा हे उपस्थित होते.