उरण : औद्योगिक आणि सातत्याने होणारी नापिकीमुळे शेतकऱ्यांनी ओसाड ठेवलेल्या जमिनीवर आदिवासींनी भात लागवड करीत शेतीचे महत्व सिद्ध केले आहे. उरण मधील वाढती मजुरी, मजुरांचा अभाव आणि निसर्गाच्या अनियमितपणा यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी शेतीकडे दुर्लक्ष केले आहे. यात तरुणांना शेतीची ओढ नाही. त्यामुळे या जमिनी ओसाड पडल्या होत्या. मात्र आदिवासी बांधवांनी चिरनेर परिसरातील ओसाड शेत जमिनीत भातरोपांची लागवड करून या ओसाड जमिनी लागवडीखाली आणल्या आहेत.
पोटाची भूक भागविणाऱ्या काळ्या आईला महत्व देऊन, या ओसाड जमिनीत भात लागवड करून चिरनेर परिसरातील आदिवासी बांधवांनी समाजातील शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. वर्षाचे बारा महिने मोलमजुरी करून पोटाची खळगी भरणारा हा समाज अलीकडे विकासाच्या मुख्य प्रवाहात येत असून, त्यांना अन्नाचे महत्त्व काय असते हे समजले आहे. दरम्यान चाणजे ता. उरण येथील शेतकरी ज्ञानेश्वर शांताराम म्हात्रे यांच्या शेतावर आदिवासी बांधवांच्या कृतीतून, पट्टा पद्धतीने भात लागवड करून, आदिवासी बांधवांना तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली उरणच्या कृषी अधिकाऱ्यांनी पट्टा पद्धतीच्या लावणीचे व चारसूत्री लावणी पद्धतीचे महत्त्व पटवून दिले आहे.
शेतात रासायनिक खतांचा वापर न करता नत्र निर्मितीसाठी गिरीपुष्प झाडाचा पाला तसेच हिरवळीची खते वापरा असा सल्ला कृषी अधिकाऱ्यांनी देत, उत्पन्न वाढीचे महत्त्व पटवून दिले. पट्टा पद्धतीची लागवड व चारसूत्रीच्या लागवडीमुळे उत्पन्नात कशी वाढ होते. याविषयीचे मार्गदर्शन करून, युरिया ब्रिकेट खतांच्या वापराविषयी देखील माहिती यावेळी दिली. यावेळी तालुक्यातील आदिवासी वाड्यातील आदिवासी बांधवांनी पट्टा पद्धतीच्या भात लागवडीच्या प्रात्यक्षिकात भाग घेतला होता. त्यांना कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी एस.डी गटकळ, उपकृषी अधिकारी ए डी बरकूल तसेच सहाय्यक कृषी अधिकारी आदिका पानसरे यांनी मार्गदर्शन व प्रात्यक्षिके करून दाखविली.