नवी मुंबई – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दुसऱ्याच दिवशी येणाऱ्या गजलसम्राट सुरेश भट यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये विशेष गजल आणि काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आलेले होते.

गजलसम्राट सुरेश भट यांचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रेरणास्थान होते. त्याच भावनेतून त्यांनी ‘भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना, आज घे ओथंबलेल्या अंतराची वंदना’ – ही भीमवंदना लिहिली व ती प्रचंड लोकप्रिय झाली. या अत्यंत रसिकप्रिय अशा भीमवंदनेने सुरू झालेली ही गजल-काव्य संध्या एकापेक्षा एक उत्तमोत्तम सादरीकरणाने रंगत गेली.

हेही वाचा – “समाजसेवेचा संस्कार तीन पिढ्यांपर्यंत राहतो, हे…”, आप्पासाहेब धर्माधिकारींना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिल्यानंतर अमित शाहांची स्तुतीसुमने

‘दु:खालाही घट्ट उराशी धरता येते, आणि त्याची सुंदर कविता करता येते, वातीमध्ये पीळ बरोबर असल्यावरती, संपून गेले तेल तरीही जळता येते’ – अशा ताकदीच्या ओळींनी मैफिलीत माहोल निर्माण करणाऱ्या आप्पा ठाकूर यांनी मैफिलीचे अध्यक्ष म्हणून अप्रतिम सादरीकरण करीत मैफिल वेगळ्या उंचीवर नेली.

‘आईचा सातबारा’ या आगामी काव्यसंग्रहातील शीर्षक कवितेने आपल्या सादरीकरणाला सुरुवात करीत आप्पा ठाकूर यांनी, ‘अस्मादिकांनो हीच आहे निर्वाणीची वेळ, जातपात अन् उच्चनीच हा बंद करूया खेळ’ – असे आवाहन करीत ‘विठ्ठला’ आणि ‘करार’ या दोन्ही गाजलेल्या गजल रसिकांच्या फर्माईशीनुसार उदंड दाद घेत सादर केल्या. ‘हृदयावरती अजून जखमा खरचटल्याच्या, हळू काढतो तुमच्यासाठी खपल्या त्यांच्या’ – म्हणत त्यांनी प्रेम विषयावरील गजलांचे अप्रतिम सादरीकरण करीत उपस्थितांची मने जिंकली.

हेही वाचा – नवी मुंबई: कार्यक्रम मोठा देखणा, उत्तम व्यवस्था; मात्र मुखपट्टीला सुट्टी

मैफिलीचे सूत्रसंचालन करणारे नवी मुंबई महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी तथा गजलकार डॉ. कैलास गायकवाड यांनी, ‘जी वीजेचा लोळ नाही, ती गजलची ओळ नाही’ अशा ताकदीच्या शब्दांत गजलची मातब्बरी कथन करीत ‘तुझ्या हातून लिहिल्या संविधानाचे फलित आहे, सवर्णाला वाटते इथे बनावेसे दलित आहे’ – अशी गजल सादर करीत बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व विषद केले. ‘दिली होतीस दिक्षा तू कुठे मी घेतली बाबा’ – या गजलेतून त्यांनी आंबेडकरी चळवळीचे वर्तमान कथन केले.

गजलकार जनार्दन म्हात्रे यांनी आजच्या स्मारकातील कार्यक्रमात बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या विचारप्रवर्तक गजला सादर करणार असा इरादा सांगत, ‘धर्म कोणा सावरतो अन् जात सावरे कुणाला, सर्व गट तट माणसांचे निर्मिकाचा दोष नाही’ – अशी स्पष्ट भूमिका गजलेतून मांडली. ‘बातमी फोफावते ही लोकसंख्येचीच केवळ, आजही देशात जन्मती जातीच केवळ’ – हे वास्तवही त्यांनी परखडपणे मांडले. लोककवी वामनदादा कर्डक यांच्या ओळी उधृत करीत नमुंमपा तुर्भे माध्यमिक शाळेतील शिक्षक, कवी मधुकर वारभुवन यांनी ज्ञानसूर्य बाबासाहेबांमुळे झालेल्या समाज परिवर्तनाचा प्रकाशमान आलेख मांडणारी ‘एक सूर्य’ ही कविता सादर केली. त्याचप्रमाणे, ‘ना रमतो मी स्वप्नांच्या दुनियेत, ना कल्पनेचे इमले बांधतो, लिहूनी समतेचे गीत मी, मानवतेला पुजितो’ – असे म्हणत बाबासाहेबांना युगनिर्मात्याची उपमा देणारी कविता सादर केली.

हेही वाचा – दासबोधाच्या निरुपनातून आप्पास्वारींना श्री सदस्यांच्या मनात संस्काराचे रोपन केले: उपमुख्यमंत्री फडणवीस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सहभागी गजलकार, कवींचे समाजविकास विभागाचे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती उत्सवानिमित्त आयोजित ‘जागर’ या व्याख्यानमालेप्रमाणेच गजलसम्राट सुरेश भट यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या ‘भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना…’ या मराठी गजल – काव्य मैफिलीलाही मोठ्या संख्येने उपस्थित राहत श्रोत्यांनी उत्स्फुर्तपणे जिंदादील दाद दिली.