पनवेल – तळोजा मध्यवर्ती कारागृहात दोन न्यायबंदींकडून एका बंदीवर जुन्या वादातून धारदार पत्र्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कारागृहातील सर्कल अंमलदार पोलीस हवालदारांनी खारघर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ला करणारे दोघेही बॉम्बस्फोट प्रकरणातील बंदी आहेत.

कारागृहातील सर्कल क्र. १ मधील बॅरक क्र. १ मध्ये बंद असलेल्या गिरीश कुमारन नायर या बंदीवर शमिल साकिब नाचन आणि इरफान मुस्तफा लांडगे या दोघांनी अचानक हल्ला केला. यावेळी गिरीश नायर यांच्या छातीवर धारदार पत्र्याने वार करण्यात आला. हा पत्रा कारागृहात सुरू असलेल्या रंगकामासाठी वापरण्यात येत होता.

हवालदार यांनी दिलेल्या जबाबानुसार, सर्कल उघडण्याच्या वेळेस अचानक ओरडण्याचा आवाज आल्याने ते शिपाईंसह संबंधित बॅरककडे गेल्यावर हा प्रकार दिसला. तत्काळ कारवाई करत जखमी नायर यांना कारागृहाच्या रुग्णालयामध्ये आणि त्यानंतर वाशी येथील मनपा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर कारागृहाच्या रुग्णालयात देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

दरम्यान, घटनेनंतर घेतलेल्या बॅरक तपासणीदरम्यान एका बादलीत रंगकामासाठी वापरात असलेला पत्रा आढळून आला आहे. गिरीश नायर यांनीही आपल्या जबाबात या हल्ल्यामागे जुन्या वादाची पार्श्वभूमी असल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणी आरोपी बंदी शमिल नाचन आणि इरफान लांडगे यांच्याविरुद्ध खारघर पोलिस ठाण्यात सरकारी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारागृह प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत सुरक्षाव्यवस्थेचा पुनर्विचार सुरू केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेतील जखमी गिरीश हा गेल्या वर्षी ३० मार्चपासून कारागृहात न्यायबंदी आहे. शमिल साकिब नाचन हा २३ ऑगस्ट २०२३ पासून तर इरफान मुस्तफा लांडगे हा ३० एप्रिल २०१३ पासून न्यायबंदी आहेत.