पनवेल : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने बुधवारी सकाळी पनवेल महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीसमोर जोरदार घोषणाबाजी करत पालिकेच्या प्रवेशव्दारावर बॅरिगेट्स झुगारून शिवसैनिकांनी प्रवेशव्दारावर धडक दिली. काही तासांसाठी महापालिकेचे प्रवेशव्दार घोषणांनी दुमदुमून सोडले. महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्डे आणि अपु-या पाणी पुरवठ्यासाठी शिवसेनेने हे आंदोलन करून महापालिकेचे लक्ष्य वेधले.
महापालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करून सर्वत्र रस्ते कॉंक्रीटीकरण आणि दुरुस्तीची कामे हाती घेतली. परंतू नूकतेच केलेल्या रस्त्यांवर पडलेल्या खड्यांकडे शिवसैनिकांनी पालिका आय़ुक्तांचे लक्ष वेधले. कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने कोट्यावधी रुपयांचे घर मात्र पिण्यासाठी लाखो रुपये खर्च करून टॅंकरमधून पाणी खरेदी करावे लागत असल्याची व्यथा शिवसैनिकांनी पालिका आय़ुक्तांसमोर मांडली. पालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी शिवसैनिकांची व्यथा एेकुण घेत रस्ते नवीन बांधण्याच्या कामातील दुरुस्तीसाठी कंत्राटदाराची तीन वर्षांची जबाबदारी असल्याने यावर महापालिकेचा निधी खर्च होत नसून संबंधित रस्त्याची दुरुस्ती संबंधित कंत्राटदाराकडून करून घेतली जाईल असे स्पष्टीकरण दिले. मात्र या स्पष्टीकरणावर शिवसैनिकांचे समाधान झाले नाही. निकृष्ट दर्जाचे रस्ते बनविणा-या कंत्राटदाराला महापालिकेने नेमलाच कसा असा प्रश्न संतापलेल्या शिवसैनिकांनी आयुक्तांसमोर मांडला.
अखेर नवीन रस्ता करून जेथे खड्डे पडलेत अशा ठिकाणची माहिती घेऊन त्या कामाची परिक्षण केले जाईल असे आश्वासन आयुक्तांनी शिवसैनिकांना दिले. तसेच पाणी पुरवठा सूरळीत कऱण्यासाठी सिडको मंडळासोबत समन्वय पालिकेकडून साधला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सेनेचे स्थानिक पदाधिकारी प्रदीप ठाकूर, गुरुनाथ पाटील, अवचित राऊत, दीपक घरत, शहर प्रमुख सूर्यकांत म्हसकर, प्रविण जाधव, गुरुनाथ म्हात्रे, रामदास गोवारी, प्रदीप केणी, सदानंद शिर्के, ज्योती मोहीते व इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
पनवेल महापालिकेच्या स्थापनेपासून पहिल्यांदा शिवसेना ठाकरे गट एवढ्या आक्रमकपणे आंदोलनासाठी पालिकेच्या प्रशासकीय इमारतीपर्यंत येऊन धडकली. काही दिवसांपूर्वी पनवेल महापालिकेचे आय़ुक्त मंगेश चितळे यांची भेट शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळांतील पदाधिका-यांनी घेतली होती. या बैठकीत मालमत्ता करासंदर्भात चर्चा झाली होती. त्याच बैठकीत काही कंत्राटदारांच्या निकृष्ट कामाविषयी संताप आयुक्तांसमोर मांडण्यात आला. मात्र या बैठकीत तोडगा न निघाल्याने शिवसेनेने बुधवारी आंदोलनाचे पाऊल उचलले.
मालमत्ता कर विरोधात १३ ऑगस्टला महाविकास आघाडीने दंड थोपटले…
मालमत्ता कराविरोधात लवकरच शेकाप, शिवसेना (ठाकरे गट), कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) हे एकत्र येऊन आंदोलन करणार आहेत. नऊ वर्षांचा मालमत्ता कर एकत्र भरायला सांगणा-या महापालिकेने सर्वसामान्य करदात्यांचा कोणताही विचार न करता ९० टक्के शास्ती माफीची अभय योजना लागू केल्याचा रोष महाविकास आघाडीचे नेते या आंदोलनातून व्यक्त करणार आहेत.
मालमत्ता करासोबत अजूनही इतर विषय नऊ वर्षात महापालिकेच्या प्रशासनाने दूसरी अभय योजना अवघ्या काही दिवसांपूरती लागू केल्याने त्याचा लाभ कमी रहिवाशांना होईल. तसेच महापालिकेने स्थापनेनंतर पहिल्याच वर्षी मालमत्ता कराची देयक दिली असती तर हा विलंब नागरिकांकडून झाला नसता.
महापालिकेने देयके पाठविण्यासाठी केलेल्या चुकीच्या कार्यपद्धतीची शिक्षा पनवेलच्या सर्वसामान्य करदात्यांना मिळाली आहे. चार वर्षांची मालमत्ता कराचे देयक एकत्रित पाठविल्याने थकीत कराची रक्कम मोठी दिसत आहे. सिडको वसाहतींमध्ये अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील रहिवाशांची घरे मोठ्या प्रमाणात असल्याने एकरकमी कर भरणे शेकडो करदात्यांना शक्य होणार नसल्याने कराचे दर कमी करून अभय योजनेची सवलत कायम ठेवून कर टप्याटप्याने भरण्याची सुविधा द्यावी महापालिकेच्या स्थापनेनंतरही सिडकोचे सेवा शुल्क सिडकोवासियांनी सिडकोकडे जमा केल्यामुळे दुहेरी कराचा मुद्दा अगोदर महापालिकेने सोडवावा. सिडकोकडे जमा केलेल्या सेवा शुल्क परत मिळत नसेल तर त्या काळातील कर आकारू नये अशा विविध मुद्यांवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष कर विरोधी आंदोलनात उतरणार आहेत.