नवी मुंबईच्या विस्ताराचा भाग म्हणून सिडकोने शहराला लागूनच असलेल्या बेलापूर खाडी पलीकडे उलवे नोड विकसित केले आहे. मात्र या शहरातील नागरिकांना आपल्या समस्यां मांडण्यासाठी उरण मधील न्हावा शेवा किंवा नवी मुंबईतील एन आर आय ही पोलीस ठाणी गाठावी लागत आहेत. त्यामुळे उलव्या सारख्या वाढत्या शहराला स्वतंत्र पोलीस ठाणे उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : एपीएमसी आवारातील रस्ते कचरामुक्त कधी होणार?

नवी मुंबई व उरण या दोन शहरांच्या मध्यभागी सिडकोने उलवे नोड उभारले आहे. या शहराला नेरूळ ते खारकोपर या रेल्वे मार्गाने जोडले आहे. त्याच प्रमाणे जेएनपीटी बंदरात जाणाऱ्या रस्त्याचे जाळे ही शहरा भोवती निर्माण झाले आहे. तर लवकरच सुरू होणारे नवी मुंबई विमानतळ ही याच शहराला लागून आहे. त्यामुळे मध्यवर्ती शहर म्हणून उलवे नोड आकार घेत आहे. या शहराने सध्या ७० ते ८० हजार लोकसंख्येचा टप्पा गाठला आहे. यामध्ये भविष्यात आणखी लोकसंख्या वाढणार आहे.

हेही वाचा- स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये उरण नगरपरिषदेचा राज्यात ४२ वा क्रमांक

मात्र, या वाढत्या शहरातील नागरिकांना आवश्यक असलेल्या पोलीस संरक्षणासाठी उलवे नोडमधील गव्हाण, न्हावा, बामन डोंगरी, कोपर, शिवाजी नगर येथील नागरिकांना उलवे नोड पासून २० किलोमीटर वरील न्हावा शेवा पोलीस ठाणे तर वहाळ, मोरावे, उलवे या विभागातील नागरिकांना ८ ते १० किलोमीटर अंतरावरील एन आर आय गाठावे लागत आहे. त्यामुळे उलवे नोड शहरा करीता स्वतंत्र पोलीस ठाणे सुरू करण्याची मागणी उरणचे आमदार महेश बालदी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलीं आहे.