पनवेल: नवी मुंबईतील उलवे परिसरात २७ वर्षीय अलविना किशोरसिंग राजपूत या महिलेचा निर्घृण खून झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली होती. प्रथमदर्शनी अनोळखी व्यक्तीकडून खून झाल्याचा कांगावा अलविना हीचा पती किशोरसिंग राजपूत याने केला. मात्र, अवघ्या काही तासांत नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस मारेकऱ्यांचा शोध लावण्यात यशस्वी ठरले. मारेकऱ्यांना ताब्यात घेतल्यावर अलविना हीचा पती किशोरसिंग याच्याविरोधात पोलिसांना सबळ पुरावे मिळाले. आणि या खुनामागचे भयंकर सत्य समोर आले.
अलविनाचा खूनासाठी तिच्या पतीनेच सहा लाख रुपयांची सूपारी मारेकऱ्यांना देण्याचे ठरले होते. प्रेमविवाह करून संसार थाटलेल्या पतीनेच काही वर्षानंतर तीचा कंटाळा आल्याने अशा प्रकारे पत्नीचा काटा काढल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने उलवे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.रविवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सूमारास उलवे येथील सेक्टर ५ येथील रेडियन्स स्प्लेंडर या इमारतीच्या समोरील रस्त्यावर अलविना किशोरसिंग उर्फ अलविना आदमअली खान (वय अंदाजे २५) यांची निर्घृण हत्या करण्यात आली.
गळा चिरून तिचे प्राण घेतल्याची प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर नवी मुंबई पोलीस दलाच्या पोलिसांच्या चक्रे फीरु लागली. अलविनाचा पती किशोरसिंग राजपूत याचे उलवे येथे औषध विक्रीचे दुकान आहे. किशोरसिंग याने रविवारी खून झाल्यानंतर पोलिसांना दिलेल्या माहितीनूसार रविवारी दुपारी दुपारी दिड वाजता अलविना “ मुंबईला माहेरी जाते” असे सांगून ती घराबाहेर गेली होती. सायंकाळपर्यंत घऱी न परतल्याने किशोरसिंग यांनी वारंवार तीला फोन केले असेही सांगीतले. अलविनाने नेरुळ येथे पोहचली. हॉटेलमधून जेवण मागवून ठेवा अशी खोटी माहिती पोलिसांना किशोरसिंगने दिली.
दरम्यान रात्रीच्यावेळी किशोरसिंग स्वतावर संशय येऊ नये म्हणून तो मित्रांसोबत औषध दूकानासमोर बॅडमिंटन खेळत होता, तिथे त्याच्याच एका मित्राने येऊन शेजारच्या रस्त्यावर महिला रक्तबंबाळ पडल्याचे कळाल्यानंतर तो घटनास्थळी पोहोचल्याचे पोलिसांना त्याने सांगीतले. स्वताला या मृत्यूमुळे धक्का बसल्याचा दिखावा रविवारी रात्री किशोरसिंग करत होता. मात्र नवी मुंबई पोलीस दलाच्या गुन्हे अन्वेषण विभाग आणि उलवे पोलिसांनी किशोरसिंग याचा दिखाव्याचा बुरखा फाडून तीन मारेकऱ्यांचा या प्रकरणी शोध घेतल्याची माहिती पोलिसांच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. पोलीस तपासात किशोरसिंग राजपूत यांनी आपल्या पत्नीचा खून करण्यासाठी तब्बल सहा लाख रुपयांची सूपारी तीन गुंडांना देण्याचे ठरवले.
खूनादरम्यान तो स्वतः उलवे औषध दूकानासमोर मित्रांसोबत बॅडमिंटन खेळत थांबणार हा सुद्धा त्याच्या कटाचा एक भाग असल्याचे समोर आले. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या सहाय्याने घटनास्थळाभोवतीच्या मार्गांवरुन त्यावेळी धावणाऱ्या वाहनांचा मागोवा घेतल्यावर मारेकऱ्यांपर्यंत पोलीस पोहचू शकले. मारेकरी पळून गेलेल्या दिशेचे केंद्रस्थानी ठेवून हा तपास करण्यात आला. किशोरसिंगने रचलेल्या या खूनाच्या कटात अजून एका महिलेने त्याला साथ दिल्यामुळे या महिलेची सुद्धा पोलीस कसून चौकशी करत आहेत. नवी मुंबई पोलीस दलाकडून लवकरच या गुन्ह्यातील मारेकऱ्यांची नावे प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.