उरण : उरण (मोरा) ते मुंबई (भाऊचा धक्का) दरम्यानची जलसेवा शनिवारपासून पूर्ववत करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना नऊ दिवसांनी दिलासा मिळाला आहे. शनिवारी सकाळी ११ वाजल्यापासून ही सेवा पूर्ववत करण्यात आली असून या मार्गावरील प्रवासी बोटी एक तासाऐवजी दोन तासांनी सोडण्यात येणार असल्याचे मेरिटाईम बोर्डाने म्हटले आहे.

बिपोरजोय चक्रीवादळामुळे समुद्र खवळल्याने उरण ते मुंबई दरम्यानची जलसेवा शुक्रवारपासून (९ जून) बंद करण्यात आली होती. ही जलसेवा
पहिल्यांदाच अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्यात आली होती. पावसाळ्यातही सुरू असलेल्या या मार्गाने प्रवासी प्रवास करतात. वादळामुळे खवळलेल्या समुद्रात प्रवासी बोटींना अपघात होण्याच्या शक्यता असल्याने महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने ही सेवा बंद केली होती.

हेही वाचा – नवी मुंबई : लसणाच्या दरात ५ ते १० रुपयांनी वाढ, घाऊक बाजारात लसूण प्रतिकिलो १५० रुपयांवर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सेवा बंद असल्याने उरणमधील चाकरमानी, विद्यार्थी, व्यावसायिक व मुंबईत मासे विक्री करणाऱ्या महिलांना याचा फटका बसला होता. चक्रीवादळ जमिनीवर धडकल्याने त्याची तीव्रता कमी झाल्याने बंद करण्यात आलेली मोरा मुंबई जलसेवा पूर्ववत करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मोरा बंदर अधिकारी प्रकाश कांदळकर यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे ही सेवा हवामानातील बदलानुसार बंद करण्यात येईल, अशीही माहिती दिली आहे.