सभागृहात एकमेकांवर पाण्याच्या बाटल्यांची फेकाफेकी

सर्वसाधारण सभेदरम्यानच्या गोंधळात नगराध्यक्षांविषयी अनुदार उद्गार काढण्यात आल्याच्या कारणाने उरण नगरपालिकेच्याच सभागृहात सत्ताधारी भाजप आणि विरोध पक्ष शिवसेनेच्या सदस्यांत बुधवारी जोरदार हाणामारी झाली. पाण्याच्या बाटल्या, माइक एकमेकांवर भिरकावत दोन्ही पक्षांच्या सदस्यांनी एकमेकांना यथेच्छ शिवीगाळ केली. त्यानंतर दोन्ही पक्षांनी एकमेकांवर उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

उरण नगरपालिकेत भाजपचे १३ नगरसेवक आणि थेट मतदारांनी निवडून दिलेले नगराध्यक्ष आहेत तर, उर्वरित ५ नगरसेवक शिवसेनेचे आहेत. या निवडणुकीपूर्वीपर्यंत एकत्रितपणे सत्तेत नांदणाऱ्या शिवसेना-भाजपमध्ये निवडणुकीपासूनच संघर्ष सुरू आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अर्थसंकल्पाच्या सभेतही दोन्ही पक्षांत वादावादी झाली होती. हाच वाद बुधवारी हाणामारीवर आला.

बुधवारी सकाळी ११ वाजता आयोजित उरण नगरपालिकेची सभा सभा सुरू होताच सत्ताधारी पक्षाने ठराव मांडण्यास सुरुवात केली व शिवसेनेच्या सदस्यांचे आक्षेप विचारात न घेता बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर केले. यामुळे संतापलेल्या शिवसेनेच्या सदस्यांनी गोंधळ घातला तर, भाजपचे नगरसेवकही त्यांना प्रत्युत्तर देत गोंधळ घालू लागले. हा गदारोळ बराच वेळ सुरू राहिल्याने अध्यक्षांनी सभा बरखास्तीची घोषणा केली. यावरून चिडलेले शिवसेनेचे सदस्य व माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे यांनी नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्याविषयी अनुदार उद्गार काढले. त्यामुळे वातावरण आणखी तापले. सभा बरखास्त झाल्यानंतर प्रेक्षागृहातून सभागृहात आलेला भाजपचा कार्यकर्ता नीलेश पाटील आणि गणेश शिंदे यांच्यात हाणामारी झाली. नीलेश पाटील याने शिंदे यांच्यावर बाटली फेकून मारली तर शिंदे यांनीही पाटील याच्या दिशेने माइक भिरकावला. या वेळी उपस्थित असलेल्या अन्य सदस्यांनी दोघांनाही आवरले.

शहर नियोजन आराखडय़ात शिंदे यांच्याच नगराध्यक्षपदाच्या कालावधीत वाहनतळाचे आरक्षण ठेवण्यात आले होते. तसेच ते रद्दही करण्यासंदर्भात मंजुरीही घेण्यात आलेली होती. वाहनतळाचे आरक्षण हटविण्याचा ठराव आला असताना त्यांनी विरोध केला. त्याचप्रमाणे, विशेष सभेत महिला नगराध्यक्षांना अपशब्द वापरून प्रशासनालाही धमकावले आहे.

सायली म्हात्रे, नगराध्यक्षा, उरण

शहराच्या नियोजन आराखडय़ात वाहनतळासाठी ४९ व ४९ (अ) असे आरक्षण असताना बांधकाम व्यावसायिकाच्या फायद्यासाठी आरक्षण क्रमांक ४९ रद्द करण्याला आमचा विरोध आहे. एकीकडे वाहतूक कोंडीवर उपाययोजनांचा ठराव मांडायचा आणि दुसरीकडे वाहनतळासाठी आरक्षित भूखंड रद्द केल्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार आहोत.

गणेश शिंदे (माजी नगराध्यक्ष)