उरण : पनवेल आणि उरण तालुक्याच्या कुशीत तिसरी मुंबई वसवण्याचे स्वप्न दाखवत नवे विमानतळ आणि अटल सेतूच्या अवती भोवती विस्तीर्ण असे महामार्ग आणि मोठ्या भरावाचे प्रकल्प उभारणीची सोस पूराच्या कवेत घेऊ लागल्याचे दिसू लागले आहे. या भागातील नैसर्गिक लहान मोठ्या टेकड्यांतून वाहत येणारे पावसाचे पाणी नवे राष्ट्रीय महामार्ग अडवू लागल्याने मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही बहुचर्चित अटल सेतूचा मार्ग बंद अडवला गेल्याचे चित्र होते. हे महामार्गावरून पावसाच्या पाण्यामुळे तुंबले आणि पळस्पे ते जेएनपीटी बंदर रस्त्यावर दोन फुटापर्यंत पाणी साचले होते. या पाण्यात मोठे कंटेनर अडकून पडल्याने यामागे लहान वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

भविष्यात नवी मुंबई शेजारी उरण पनवेल परिसरात महामुंबईच्या उभारणीची घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठी हजारो कोटी खर्च करून राष्ट्रीय महामार्ग आणि उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. मात्र या मार्गावर पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने हा संपुर्ण परिसर तुंबु लागल्याचे सातत्याने दिसून लागले आहे.

जेएनपीए या आंतरराष्ट्रीय बंदराला जोडणारे हे राष्ट्रीय महामार्ग आहेत. १६ ऑगस्ट २०१४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते भूमीपूजन करून जेएनपीएला (उरणला) जोडणाऱ्या दोन राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले आहे. त्यासाठी जवळपास तीन हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या राष्ट्रीय महामार्गावरून पावसाचे पाणी धोधो वाहत आहे. मंगळवारी दुपारी पळस्पे ते जेएनपीए बंदर या मार्गावरील गव्हाण फाटा (जे डब्ल्यू आर गोदाम) नजीकच्या डोंगरावरून येणारे पाणी साचले होते. दोन फुटा पेक्षा अधिक पाणी साचल्याने येथे वाहने अडकून पडली होती अतिशय व्यस्त असलेल्या या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक विभागाने या मार्गावरील दुभाजक तोडून पाण्याला मार्ग दाखवला.

बेकायदा कंटेनरयार्ड डोके दुखी कायम

जासई येथील उरण – पनवेल सेवा मार्गाच्या दोन्ही बाजूला उभारले गेलेले अनधिकृत कंटेनरयार्ड, विविध दुकाने, टपऱ्या याच्या दोन्ही बाजूंनी सेवा मार्ग बांधले गेले आहेत. यातील एक सेवा मार्ग गव्हाण, कोपर, न्हावा, गव्हाण फाटा आदी गावांकडे जातो, तर दुसरा चिर्ले, रांजणपाडा, दास्तान, वेश्वी, धुतुम व इतर गावांना जोडला आहे. सेवा मार्गातील पाण्याचा निचरा होण्यासाठी क्षमतेप्रमाणे गटारे बांधली गेली आहेत.

मात्र पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारे, नाल्यांची व्यवस्था करण्याचे काम स्थानिक ग्रामपंचायत आणि सिडकोचे असल्याचे महामार्ग प्राधिकरणाचे म्हणणे आहे. या कामांचा अजूनही पत्ता नाही. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग असलेल्या जेएनपीए ते नवी मुंबईला जोडणाऱ्या आम्र मार्गावरील उलवे नोड मधील वहाळ साई मंदीर,उड्डाणपूला खाली दोन ते अडीच फुटांचे पाणी साचले होते. उलवे नोड मधील वहाळ गावा नजीक असलेल्या उड्डाणपूलाखाली दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे.

भारतीय रस्ते विकास प्राधिकरणच्या (एन एच आय) अखत्यारीत हा राष्ट्रीय महामार्ग मोडतो. हा परिसर सखल भागात मोडत आहे. त्यामुळे मुसळधार पावसानंतर या परिसरात पाणी साचत आहे. नवी मुंबई विमानतळा नजीकच्या या मार्गावरून नवी मुंबईत ये जा करणारी शेकडो वाहने प्रवास करतात. येथे ही पुरेसे नियोजन नसल्याचे चित्र आहे.

उरणला जोडणारे राष्ट्रीय महामार्ग की जलमार्ग ?

जेएनपीए बंदर आणि उरणला जोडणाऱ्या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरून वाहत्या पाण्यातून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. तीन हजारांपेक्षा जास्त खर्च करून जेएनपीए -उरणला जोडणारे जेएनपीए ते पळस्पे आणि जेएनपीए ते आम्र मार्ग (नवी मुंबई) या राष्ट्रीय महामार्ग यांची उभारणी करण्यात आली आहे. या दोन्ही मार्गाच्या आजूबाजूला डोंगर परिसर आहे. या डोंगरावरून पावसाळ्यात वाहणारे ओढे हे या मार्गातून वाहत आहेत.

मात्र या डोंगरावरील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे ठोस नियोजन करण्यात आलेले नाही. या मार्गावरील जासई,गव्हाण फाटा(जे डब्ल्यू आर गोदाम)उलवे नोड,उड्डाणपूल आदी ठिकाणी महामार्गात पाणी साचत आहे. यात प्रामुख्याने उरण – पनवेल मार्गावरील जासई उड्डाणपूलाच्या शंकर मंदीरा जवळ येथील डोंगरावरून येणारे धोधो पाणी वाहत आहे. याच जेएनपीए ते नवी मुंबईच्या आम्र मार्ग राष्ट्रीय महामार्गाच्या वाहत्या पाण्यातून वाहनांना मार्ग काढून प्रवास करावा लागत आहे. या डोंगरातील पाण्या बरोबर येणारा चिखलही मार्गावर वाहून येतो.

उरण पनवेल मार्गावरील जासई शंकर मंदिरा नजीकच्या भागात डोंगर आणि दगड खाणी आहेत. या परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात डोंगरावर पडणारे पाणी वाहून येते. या वाहून येणाऱ्या पाण्याचा निचरा होत नसल्याने हे पाणी थेट रस्त्यातून वाहत आहे. जुन्या राज्य महामार्गावर याच परिसरात रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे.

या संदर्भात एनएचआयचे उपसंचालक यशवंत घोटकर यांच्याशी संपर्क साधला एन एच आय कडून मार्गातील पाणी काढण्यासाठी मशनरी आणि यंत्रणा राबविण्यात येत असल्याचे सांगितले. रस्तावर डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा निचरा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सततच्या पावसामुळे यात अडथळा निर्माण होत आहे. तर गव्हाण फाटा,जासई येथील पाणी काढण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.