उरण : उलवे नोड मधील कोपर गावातील पारंपारिक स्मशानभूमीवर सिडकोने तोडक कारवाई निश्चित केल्याने सोमवारी सकाळी ग्रामस्थांनी भर पावसात या कारवाईला विरोध करीत आंदोलन सूरु केले आहे. उलवे नोडच्या सेक्टर ९ मधील ही स्मशानभूमी नागरीवस्तीत येत असल्याने येथील काही नागरिकांनी ती हटवण्याची मागणी केली आहे. त्यानुसार सिडकोकडून ही स्मशानभूमी हटवून इतरत्र स्थलांतरित करण्यात येणार आहे.
ग्रामस्थांची पारंपरिक स्मशानभूमी हटवून ती चार किलोमीटर अंतरावर नेण्यात येणार आहे. याला येथील नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे ही स्मशानभूमी हटवू देणार नाही अशी भूमिका भाजपा नेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी सिडकोच्या स्थानिक भूमिपुत्रांच्या विरोधातील भूमिकेचा जोरदार विरोध करीत करेंगे या मरेंगे अशी भूमिका घेत सिडकोच्या कारवाईला तीव्र विरोध केला आहे.केंद्र व राज्य सरकार जनतेसाठी काम करीत आहे. मात्र सिडको स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय करीत आहे. या अन्याय आता सहन करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर सिडकोने प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवावेत अशी भूमिका घेतली आहे. तर सिडको वारंवार भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करीत आहे हे खपवून घेतले जाणार नाही. त्यामुळे आता प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढावीच लागेल, असा आक्रमक पवित्रा माजी खासदार ठाकूर यांनी घेतला आहे.
या आंदोलनात येथील नागरिक आणि महिलाही सहभागी झाले आहेत. यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर,माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे यांच्यासह परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवावेत अशी भूमिका घेतली आहे. तर सिडको वारंवार भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करीत आहे हे खपवून घेतले जाणार नाही. पनवेल तालुक्यातील कोपर (गव्हाण) येथील शेकडो वर्षांपूर्वीच्या पारंपारिक स्मशानभूमीवर सिडको तोडक कारवाई करणार असल्याचे समजताच या कारवाईला विरोध करण्यासाठी सोमवारी (दि. २६ मे) सकाळी कोपरसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकवटले.
कारवाई स्थगित : कोपर ग्रामस्थांनी केलेले आंदोलन आणि याच स्मशानभूमीत जळीत झाल्याने सिडको आणि आंदोलन कर्त्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर कारवाई स्थगित करण्यात आली असल्याची माहिती उलवे नोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन राजांनी यांनी दिली.