उरण : १२ जानेवारी २०२५ ला उरण ते नेरुळ/ बेलापूर हा लोकल मार्ग सुरू होऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. या कालावधीत मार्गावरील प्रवासी संख्येत वाढ झाली असली तरी या मार्गावरील फुकट्या प्रवाशांची संख्याही वाढू लागली आहे. दिवसाची १ लाखांची तिकीटविक्री आता ५० हजारांवर आली असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.उरण ते नेरुळ/ बेलापूर या मार्गामुळे उरणवरून नवी मुंबई आणि मुंबईत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्वस्त आणि जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे. या मार्गाने दररोज ७ ते ८ हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. दिवसेंदिवस या मार्गावरील प्रवासी संख्येत वाढ होत आहे. मात्र लोकल एका तासाच्या अंतराने असल्याने याचा या प्रवासमार्गाला फटका बसत आहे.

या लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची मागणी केली जात आहे. त्यासाठी थेट केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आश्वासन दिले आहे. मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनीही अशाच प्रकारचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून उरण ते नेरुळ/ बेलापूर या मार्गावरील लोकल अर्ध्या तासाच्या अंतराने सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे. लोकलच्या फेऱ्यांत वाढ न झाल्याने उरण शहरातून नव्याने सुरू झालेल्या एनएमएमटी बस सेवेकडे प्रवासी वळू लागले आहेत.

हेही वाचा…नैना प्रकल्प यशस्वी करण्यासाठी सिडकोचे शेतकऱ्यांना आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सीसीटीव्हीची प्रतीक्षाच

उरण स्थानकासह या मार्गावरील द्रोणागिरी, न्हावा शेवा व शेमटीखार या चारही स्थानकांच्या परिसरात सीसीटीव्ही बसविण्याची मागणी करूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. येथील उरण स्थानकानजीक झालेला भीषण अपघात आणि द्रोणागिरी स्थानकावर लोकल मधून पडलेली महिला या दोन घटना ताज्या आहेत. अपघातानंतर स्थानिक पोलिसांनीही रेल्वे विभागाकडे सीसीटीव्ही बसविण्याची मागणी केली आहे. उरण येथून प्रवास करणारे ३० टक्के प्रवासी फुकटचा प्रवास करीत असावेत, कारण परतीचे तिकीट काढणाऱ्याची संख्या कमी झाली आहे. राजेश कुमार, मुख्य अधीक्षक, उरण रेल्वे