उरण : जासई उड्डाणपुलावर सोमवारी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. हा येथील महिनाभरातील दुसरा अपघात होता. १३ जानेवारीला याच पुलावर उरणच्या एका महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला होता. तर दररोज किमान एक तरी अपघात होत आहे. त्यामुळे हा पूल दुचाकीस्वारांसाठी मृत्यूचा सापळा बनू लागला आहे.

उरण-पनवेल या जुन्या मार्गावर जासई नाका आहे. या नाक्यावर दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होते. या मार्गाचे जेएनपीटी ते आम्र मार्ग (नवी मुंबई) असे रुंदीकरण करण्यात आले. त्यासाठी जासई येथे दास्तान फाटा ते शंकर मंदिर असा दीड किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात आला. सुरुवातीला रखडलेल्या या पुलाचे काम सुरू झाले. त्याचदरम्यान जासई गावाजवळ पुलाची तुळई (गर्डर) पडून चार मजुरांचा मृत्यू झाला होता. तर पूल वाहतुकीसाठी खुला करून दोन वर्षे होऊनही पनवेल व नवी मुंबईच्या दिशेने जाणारी मार्गिका येथील शंकर मंदिरामुळे रखडली आहे. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असले तरी ही मार्गिका अर्धवट आहे. या आकुंचित मार्गिकेमुळेही अपघात घडले आहेत.

जासई उड्डाणपूल हा चार पदरी आहे. तर पुलाच्या दोन्ही बाजूने सेवा मार्ग आहेत. मात्र या पुलाची उरणकडून पनवेलकडे जाणारी सेवा मार्गिका जासई शंकर मंदिरामुळे रखडली आहे. त्यामुळे अनेक अवजड वाहने पुलाला वळसा घालून विरुद्ध दिशेने धोकादायक प्रवास करीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वेगमर्यादेच्या नियमाला फाटा

पुलावरून वाहने चालविली जात असताना वाहनचालक वेगमर्यादा पाळत नाहीत. त्यामुळे अपघातात वाढ झाली आहे. सुसाट जाण्याच्या नादात अवजड वाहनांना धडक दिल्यानेही अपघात होत आहेत. नवी मुंबई व पनवेल, उरणला जोडणाऱ्या जासई उड्डाणपुलामुळे प्रवासाचे अंतर कमी झाले आहे. मात्र जासई पुलाच्या अपूर्ण कामामुळे अपघातांत वाढ झाली असून पुलाचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करावे. हेमंत पाटील, नियमित प्रवासी