उरण : गेल्या आठवड्यात शुक्रवारपासून वादळी वाऱ्यामुळे हवामान विभागाने खराब वातावरणामुळे धोक्याचा इशारा देत उरणच्या मोरा, करंजा, जेएनपीए बंदर, करंजा आणि घारापुरी येथील जलसेवा तात्पुरती खंडित केली होती. ही जलसेवा गुरुवारी दुपारी १ वाजल्यानंतर पूर्ववत करण्यात आली आहे. यामुळे आठवडाभराने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

उरणच्या मोरा, करंजा, जेएनपीए बंदर, करंजा आणि घारापुरी येथून जलसेवा आहे. ही सेवा गेल्या आठ दिवसांपासून बंद होती. त्यामुळे या मार्गावरील दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला होता. मात्र हवामानात बदल झाल्याने ही सेवा पुन्हा सुरू झाली आहे. शुक्रवारी हवामान खराब झाल्याने धोक्याचा बावटा लावला होता. त्यामुळे उरणच्या मोरा ते मुंबई, करंजा ते रेवस (अलिबाग), घारापुरी व जेएनपीए दरम्यानच्या दोन्ही जलसेवा तात्पुरत्या स्वरूपासाठी बंद करण्यात आली होती. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. हवामान विभागाकडून वादळी वाऱ्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव ही प्रवासी सेवा बंद करण्यात आली होती. त्यात हवामान विभागाने धोक्याचा इशारा जाहीर केला होता. त्यामुळे मोरा ते मुंबई जलसेवा बंद करण्यात आली होती. या संदर्भात मोरा बंदर अधिकारी नितीन कोळी यांच्याशी संपर्क साधला असता गुरुवारी समुद्र शांत झाल्याने ही सेवा पूर्ववत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

दरवाढीचा बोट व्यवसायावर परिणाम

आधीच अटल सेतू व उरण ते बेलापूर/ नेरुळदरम्यानची लोकल सेवा सुरू झाल्याने या मोरा- मुंबई जलसेवेच्या फेरीसाठी लागणारा खर्चही निघत नसल्याने जलवाहतूक करणारे बोटमालक अडचणीत आले आहेत. ब्रिटिश काळापासून मुंबईत ये जा करण्यासाठी उरणच्या मोरा व मुंबईतील भाऊचा धक्कादरम्यानची जलसेवा सुरू आहे. मुंबईत अवघ्या अर्ध्या ते एक तासात या मार्गाने पोहचता येते. त्यामुळे उरणमधील चाकरमानी, व्यवसायिक आणि सर्वसामान्य प्रवासी ही याच मार्गाचा वापर करीत असल्याने मोरा- मुंबई या जलमार्गावरील प्रवासाच्या तिकिटाचे दर वाढविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे वादळी वाऱ्यामुळे या मार्गाने प्रवास करणे धोकादायक असल्याने प्रवासी पर्यायी मार्गाने प्रवास करीत आहेत. मात्र या सर्वांचा मेरिटाइम बोर्डाच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या बोट व्यवसायावर परिणाम झाला आहे.