नवी मुंबई Diwali 2025 : नवीमुंबई शहरातील एक गाव असे आहे की, त्या गावात दिवाळी अनोख्या पद्धतीने साजरी केली जाते. या गावातील देव १२ महिने समुद्रात असतात. दिवाळीच्या दिवसात या देवाला समुद्रातून बाहेर काढून त्याची पूजा केली जाते. त्यानंतर स्वत:च्या अंगावर फटाके फोडून दिवाळी सण साजरा करण्याची या गावची वर्षानुवर्षाची परंपरा आहे.नवी मुंबईतील बेलापूर शहरात वसलेल्या या गावाचे नाव ‘दिवाळे’ असे आहे. तर, या गावातील देवाचे नाव बहिरी देव असे असून हा देव बारा महिने समुद्रात असतो.
घारापूरी ते वाशी पुला दरम्यानच्या खाडीत हजारो फूट खोल तळाशी एका ओट्यावर बहिरीनाथ देवाची मूर्ती ठेवली जाते. वर्षेभर पाण्याखाली असलेल्या या देवाला दिवाळे गावातील कोळी बांधव नरक चतुर्दशीच्या दिवशी विशेष शोध मोहीम राबवून समुद्रातून बाहेर काढतात. विशेष म्हणजे दिवाळे गावाशेजारील अनेक गावातील लोक या बहिरी देवाच्या मूर्तीच्या शोधासाठी बोटीने समुद्रात जातात. मात्र तरी देखील ही मूर्ती खूप प्रयत्न करुनही लवकर मिळत नसल्याचे गावकरी सांगतात. देवाची मूर्ती मिळाल्यानंतर दिवाळे गावात मोठा उत्सव साजरा केला जातो. दिवाळे गावातील तांडेल कुटुंबियांकडून बहिरीदेवाची पूजा केली जाते. भाऊबीज झाल्यानंतर ही मूर्ती पुन्हा समुद्रात विसर्जित केली जाते.
दिवाळे गावात असे फोडले जातात फटाके
या गावात दिवाळी सणानिमित्त बहिरी देवाच्या पुजेनंतर मोठ्याप्रमाणात फटाके फोडले जातात. परंतू, हे फटाके सामान्यपणे फोडले जात नसून एकमेकांच्या अंगावर फेकून फोडले जातात. यात कपडे जळतात, जखमा होतात पण कोणीही तक्रार करत नाहीत. कारण हे सगळ बहिरीदेवाच्या आशीर्वादाचा भाग मानला जातो. दिवाळे गावातील एका घरातून किमात १० ते १५ हजार रुपयांचे फटाके उडवले जातात. आणि एकूण गावाचा हिशोब केला तर, ४० लाखांपेक्षा जास्त रुपयांचे फटाके अवघ्या अडीच दिवसात फोडले जातात. अनेक दशकांपासून सुरू असलेली ही परंपरा आजही कायम सुरु आहे.