नवी मुंबई – नवी मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेल्या वाशी खाडी पुलावरील वाहतूककोंडीतून सुटका होण्यासाठी बहुचर्चित असलेल्या तिसऱ्या वाशी खाडीपुलाचे काम वेगात सुरु आहे. परंतू या तिसऱ्या खाडीपुलाच्यासाठी जुन्या मार्गावर असलेल्या टोल नाक्यावरील दोन्ही बाजूची प्रत्येकी एक लेन अशा दोन लेन कमी झाल्यामुळे वाहनाचा अतिरिक्त बोजा उर्वरीत लेनवर पडत असल्याने वाशी टोलनाक्यावर सातत्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. सातत्याने होणारी वाशी खाडी पुलावरील वाहनांची गर्दी यासाठी या  तिसऱ्या पुलाची निर्मिती करण्यात येत असून या पुलाच्या निर्मितीसाठी  सुरवातीला कांदळवनाचा अडथळा निर्माण झाला होता.सुमारे दीड हेक्टरवरील कांदळवने काढून दुसऱ्या ठिकाणी लावण्याच्या अटीवर वनखात्याने रस्ते विकास महामंडळाला  आधीच परवानगी दिली होती अशा अनेक अडथळ्यानंतर या खाडीपुलाचे काम वेगवान पध्दतीने सुरु असून एल अँन्ड टी कंपनीकडून कामाला गती आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे  मुख्य प्रवेशद्वार असलेल्या वाशी खाडीपुलावरील पहिला पुल  मुंबईकडून नवी मुंबईकडे येणाऱ्या फक्त हलक्या वाहनांच्या वाहतूकीसाठी वापरला जात होता पण तो पूर्ण बंद केला आहे.तर दुसरा खाडीपुल सध्या वाहतूकीसाठी वापरण्यात येत आहे. दुसऱ्या खाडीपुलावर मुंबईकडे जाण्यासाठी ३ तर मुंबईहून पुण्याकडे जाण्यासाठी ३ लेन आहेत.परंतू सातत्याने वाढणारी वाहनांची संख्या यामुळे नेहमी दुसऱ्या वाशी खाडीपुलावर  वाहतूक कोंडी होत असते त्यामुळे वाशी खाडीपुलावर तिसरा पुल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. या तिसऱ्या पुलाच्या  कामासाठी सध्या सुरु असलेल्या दुसऱ्या खाडीपुलावरील टोलनाक्यावर व वाशी टोलनाका ते मानखुर्द उड्डाणपुल इथपर्यंत कमी जास्त प्रमाणात सातत्याे वाहतूक कोंडी होत आहे.

गणेशोत्सवापूर्वीपासून या मार्गावर वाहतूक कोंडीत भरच पडत आहे. नव्याने तयार करण्यात येत असलेल्या तिसऱ्या पुलाच्या कामात वाशी खाडी पुलावर  पुण्याहून मुंबईच्या दिशेकडे  जाणारा एक व मुंबईहून पुण्याकडे जाणारा एक अशा दोन्ही बाजुला उड्डाणपुल बांधण्यात येत आहेत.दोन्ही दिशेकडे तयार करण्यात येणाऱ्या पुलावर  प्रत्येकी तीन तीन लेन वाढणार आहे.त्यामुळे आता असलेल्या सुविधेपेक्षा दुप्पट वाहतूक भविष्यात होऊ शकणार आहे.परंतू सध्या  तिसऱ्या खाडी पुलाच्या कामामुळे या ठिकाणी अधिक वाहतूक कोंडी होत आहे.नवी मुंबईच्या दिशेने व पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची सध्याच्या दुसऱ्या पुलावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे.तिसऱ्या खाडीपुलाच्या कामामुळे पुणे व मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकांवर टोलनाक्यावर पहाटेपासूनच गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे वाहनचालकांना सातत्याने वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे.

वाशी टोलनाक्यावर अगदीसकाळपासूनच वाहतूक कोंडी पाहायला मिळते.त्यामुळे संबंधित टोलनक्यावर वेगवान गतीने टोल भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली पाहीजे. नाहीतर या टोलनाक्यावर सततच्या वाहतूककोंडीचा फटका आम्हा वाहनचालकांना बसतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • महेश कणसे, वाहनचालक

वाशी टोलनाक्यावर एकूण १८ लेन आहेत. अर्धे मुंबईकडे तसेच अर्धे पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी वापरले जातात.परंतू सध्या तिसऱ्या खाडीपुलाचे काम वेगात सुरु असल्याने टोलनाक्यावरील दोन्ही दिशेच्या प्रत्येकी एक एक अशा दोन लेन बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी होते.परंतू लवकरात लवकर वेगवान पध्दतीने गाड्या टोल भरुन पास होण्यासाठी प्रयत्न केला जातो.

  • राजू कोचरे, व्यवस्थापक ,वाशी टोलनाका

अगदी पहाटेपासूनच मुंबईच्या जाणाऱ्या मार्गावर वाशी गावापासून टोलनाक्यापर्यंत तर  मुंबईहून पुण्याकडे जाताना पहाटे दुसऱ्या खाडीपुलावर वाहनांच्या रांगाच लागलेल्या असतात. त्यामुळे वाशी टोलनाका का वाहतूककोंडीचा नाका झाला असल्याचा संताप वाहनचालक व्यक्त करत आहे.