वाशीमध्ये शेडला लोखंडी खांबांचा टेकू
नवी मुंबई : छपराला प्लास्टिकचे आवरण गुंडाळून वाशी सेक्टर-९ एमधील भाजी मंडई फळ, भाजी मंडईची दुरवस्था झाली आहे. या बाजारातील शेडला लोखंडी खांबाचा टेकू दिलेला आहे. या टेकूचा आधार निघाला तर हे मार्केट कधीही कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे भाजीविक्रेत्यांचा जीव टांगणीला लागला आहे. या ठिकाणी कोणताही अपघात होऊ नये, यासाठी पक्के बांधकाम केलेली भाजी मंडई उभारावी, अशी मागणी विक्रेते करीत आहेत.
वाशी सेक्टर-९ येथे पदपथावर फेरीवाले, भाजी विक्रेते अनधिकृतपणे पथारी पसरलेली होती. येथील रस्ता हा मुख्य रस्ता असल्याने या ठिकाणच्या पदपथावरील फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत होती. यावर तत्कालीन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्या बाजारावर कारवाई करून सेक्टर-९ ए या ठिकाणी मंडईसाठी आरक्षित फेरीवाला क्षेत्र म्हणून असलेल्या भूखंडावर या फेरीवाल्यांना स्थलांतरित केले. मात्र ही मंडई पालिकेने तयार केलेल्या बंदिस्त नाल्यावर वसविण्यात आली आहे. या ठिकाणी भाजी विक्रेत्यांनी प्लास्टिक, बाबूंच्या आधाराने शेड उभारले आहेत.
सेवा रस्ता अडगळीत
हे भाजी मार्केट वाशी डेपोच्या बाजूला असलेल्या बंदिस्त नाल्यावर स्थलांतरित करण्यात आलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी प्लास्टिक आणि बांबूच्या आधाराने मंडई उभारण्यात आली आहे. याला टेकूचा आधार देण्यासाठी लोखंडी खांब लावण्यात आलेले आहेत. मात्र हे लोखंडी खांब नाल्यालगत अलसलेल्या सर्व्हिस रस्त्यावर लावण्यात आले आहेत. हे लोखंडी खांब सेवा रस्त्याच्या मधोमध असल्याने हा रस्ता वापरावाविना आहे.
वाशी से.९ ए या ठिकाणी पक्के बांधकाम केलेली मंडई उभरण्यासाठी सन २०१६ मध्ये आमदार निधीतून एक कोटी मंजूर करण्यात आलेले आहेत. मात्र हा प्रस्ताव महापालिकेची परवानगी मिळाली नसल्याने रेंगाळला आहे.
-फकिरा सय्यद, अध्यक्ष, नवी मुंबई हॉकर्स आणि वर्कर्स युनियन