नवी मुंबई : नवी मुंबईतील पालिकेचे एकमेव सांस्कृतिक व्यासपीठ असलेल्या वाशीतील विष्णुदास भावे नाटय़गृहाच्या नूतनीकरणासाठी गेल्या सहा महिन्यांत एकही कंत्राटदार पुढे न आल्याने १३ कोटी रुपये खर्चाचे हे नूतनीकरण रखडले आहे. दोन वेळा निविदा प्रसिद्ध करूनही कंत्राटदारांनी फारसा प्रतिसाद न दिल्याने या महिन्यात येणाऱ्या कंत्राटदाराला हे काम दिले जाणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यात या नाटय़गृहाच्या नूतनीकरणाला अखेर सुरुवात होणार आहे.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सिडकोने बांधलेले भावे नाटय़गृह पालिकेने जून १९९७ रोजी आपल्या ताब्यात घेतले. खर्चाच्या दृष्टीने पांढरा हत्ती असलेल्या या नाटय़गृहावर पालिकेने टप्प्याटप्प्याने लाखो रुपये खर्च केले. मात्र गेल्या २० वर्षांत या नाटय़गृहाची म्हणावी तशी डागडुजी झालेली नाही. ध्वनियंत्रणा निकृष्ट झाली आहे. एक हजारापर्यंत प्रेक्षक क्षमता असलेल्या या नाटय़गृहातील आसनांची मोडतोड झाली आहे. मळक्या खुर्च्या श्रीमंत पालिकेची लक्तरे वेशीवर टांगत आहे. याशिवाय कलाकारांचा रंगभूषा कक्ष, तालीम कक्ष, शौचालये, विश्रांती कक्ष बाबा आदमच्या काळातील वाटू लागले आहेत. मध्यंतरी नाटक सुरू असताना डास मारण्याचा प्रयोगदेखील करावा लागत होता. काही वर्षांपूर्वी तर ऐन पावसाळ्यात व्यासपीठावरील छत कोसळले होते. त्यामुळे नूतनीकरणाची आवश्यकता भासू लागली होती.
नूतनीकरणासाठी १३ कोटी ७९ लाख रुपये खर्चाच्या निविदेला डिसेंबर २०१७ मध्ये प्रशासकीय व सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाली आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये नूतनीकरणाला सुरुवात होणे अपेक्षित होते.१३ कोटी रुपये खर्चाची पहिली निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर केवळ दोनच कंत्राटदारांनी या कामात रस दाखविला. निविदा नियमानुसार तीन निविदा आल्याशिवाय एका कंत्राटदाराला काम देता येत नाही. त्यामुळे पालिकेने फेरनिविदा मागवली. त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुन्हा निविदा मागविण्यात आल्या. येत्या ७ ऑगस्ट रोजी तिसरी निविदा प्राप्त होणार आहे. या निविदा प्रक्रियेत एका जरी निविदाकाराने रस दाखविला तरी ती स्वीकारण्याचा अधिकार पालिकेला आहे. त्यामुळे ऑगस्टच्या पुढील आठवडय़ात कंत्राटदार निश्चित होणार आहे. त्याला महिनाअखेर कामाचे आदेश दिले जाणार असून सप्टेंबरमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
जानेवारीपासून काढण्यात आलेल्या दोन निविदांना कंत्राटदारांनी प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे नाटय़गृहाचे काम रखडले आहे. या महिन्यात येणाऱ्या निविदेला स्वीकारण्याची तरतूद आहे. त्यामुळे पुढील महिन्यात या नाटय़गृहाचे काम खऱ्या अर्थाने सुरू होणार असून एका अद्ययावत नाटय़गृहाची उभारणी करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.
– मोहन डगांवकर, शहर अभियंता, नवी मुंबई पालिका