नवी मुंबई – मोरबे येथील मुख्य जलवाहिनीवरील आग्रोळी पुलाजवळ रेल्वे रूळालगत आणि चिखले गावाजवळील पुलाखाली जलवाहिनी वारंवार गळती होत असते. या ठिकाणची जलवाहिनी दुरूस्तीचे काम नवी मुंबई महापालिकेच्यावतीने करण्यात येणार आहे. त्याकरिता आज, बुधवार (१४ मे) ते गुरुवार, (१५ मे) पर्यंत २४ तासांकरिता नवी मुंबई पालिका क्षेत्रातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथून नवी मुंबई महापालिका क्षेत्रास होणारा पाणी पुरवठा आज, बुधवार, (१४ मे) रोजी, दुपारी १२ वाजेपासून ते गुरुवार,(१५ मे) दुपारी १२ वाजेपर्यंत बंद असणार आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या विभागांमध्ये बुधवारी सायंकाळी आणि गुरुवार सकाळी पाणी पुरवठा होणार नाही.
तसेच गुरुवारी, सायंकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले आहे. तर, नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्यांचा आणि सिडको क्षेत्रातील खारघर, कामोठे नोड मधील पाणी पुरवठा देखील २४ तासांकरिता बंद राहणार आहे. या कालावधीत पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन नवी मुंबई पालिकेच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.