माफियांचा नवी मुंबईत काळाबाजार; सोसायटी पदाधिकाऱ्यांचे सहकार्य?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबईत सुरू झालेल्या पाणीटंचाईचा फायदा टँकर लॉबीने उचलण्यास सुरुवात केली आहे. सोसायटींच्या नावावर घेण्यात येणारे पिण्याच्या पाण्याचे टँकर इतरत्र दोन हजार रुपयांना विकले जात आहेत. उच्चस्तरीय जलकुंभातील पाणी अशा टँकर माफियांना दिले जात असल्याने जलकुंभातील पाणी कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांना कमी पाणी मिळू लागले आहे. बांधकाम क्षेत्रांना पाणी देण्यास मज्जाव करण्यात आल्याने पिण्याच्या पाण्यावर कमाई करण्याचे तंत्र या टँकरलॉबीने अवलंबले आहे. नवी मुंबईत ३३ टक्के  पाणीकपात आहे. ती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पाण्याच्या जलवाहिन्यांना छिद्रे पाडून टँकर भरणाऱ्या माफियांवर पालिकेने अंकुश लावल्यानंतर सोसायटी पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून टँकरचालक पालिकेच्या उच्चस्तरीय जलकुंभावरून रीतसर पाण्याचे टँकर विकत घेत आहेत. पाणीटंचाई असणाऱ्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असलेले सोसायटीच्या लेटरहेडवर पत्र दिल्यानंतर पालिका जवळच्या जलकुंभावरून पाणी भरून देत आहेत.

त्यासाठी टँकरचालकाला प्रभाग कार्यालयात ६० रुपये प्रति टँकर शुल्क भरावे लागत आहे. ही पावती जलकुंभावर सुरक्षास्तव असलेल्या कर्मचाऱ्यांना दाखविल्यानंतर त्यांना पाणीपुरवठा कर्मचारी पाणी भरून देत आहेत. यात सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना पटवून जादा टँकरचे पत्र लिहून घेतले जात आहे. त्या सोसायटीला आवश्यक असणारे टँकर दिल्यानंतर शिल्लक टँकरचालक इतर सोसायटी वा बांधकाम क्षेत्रांना देत आहे. यासाठी दोन ते अडीच हजार रुपये दर आकारला जात आहे. पालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनाही या गोरख धंद्याची कल्पना असल्याचे समजते.

नवी मुंबई ऐरोली, दिघा आणि कोपरखैरणे भागांत पिण्याचे पाण्याचे टँकर लागत आहेत. पालिकेने यासाठी २५ टँकर कायमस्वरूपी सेवेत ठेवले आहेत. त्यातील तीन टँकर पालिकेचे स्वत:च्या मालकीचे आहेत. इतर टँकर हे आवश्यकतेनुसार कंत्राटदाराकडून मागविली जात आहेत.

सोसायटी वा झोपडपट्टी भागाला जलकुंभावरून पिण्याच्या पाण्याचे टँकर देताना त्याची तपासणी केली जात आहे. पालिकेचे अधिकारी पाणी हवे असलेल्या सोसायटींची पाहणी करूनच टँकर देत आहेत, मात्र अशा प्रकारे कमी आवश्यकता असताना जास्त पाणी घेणाऱ्या टँकरचालकांवर कारवाई केली जाईल.

– अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठ

२५

टँकर मनपाने कायमस्वरूपी सेवेत ठेवले आहे

२३

टँकर पालिकेच्या स्वत:च्या मालकीचे आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water tanker rate issue
First published on: 20-04-2016 at 03:23 IST