पावसाळ्याच्या काळातील सोसाटय़ाचा वारा, वादळ आणि संततधारेमुळे गेले साडेतीन महिने काढून ठेवलेला नवी मुंबई पालिका मुख्यालयासमोरील राज्यातील सर्वात उंच राष्ट्रध्वज प्रशासनाने पुन्हा फडकविला आहे. भविष्यात हा ध्वज पुन्हा उसवू नये यासाठी पॉलिस्टर व नायलॉनचे मिश्रण असलेले कापड या ध्वजासाठी वापरण्यात आले आहे. हे कापड पाऊस आणि वाऱ्याशी सामना करू शकेल, असा दावा पालिकेने केला आहे. हा राष्ट्रध्वज गेल्या वर्षी फडकविला गेला, मात्र पाम बीच मार्गावरील सोसाटय़ाचा वारा आणि मुसळधार पावसामुळे या ध्वजाची शिलाई वरचेवर उसवली जात होती. त्यामुळे दर चारपाच दिवसांनी नवा ध्वज लावण्याची कसरत पालिकेला करावी लागत होती. भिजलेल्या ध्वजाचे वजन दीडशे किलो होत असल्याने हा ध्वज फडकविण्यासाठी व उतरविण्यासाठी प्रचंड मनुष्यबळ लागत होते. त्यामुळे पाऊस ओसरेपर्यंत हा ध्वज गुंडाळून ठेवण्याचा मार्ग पालिकेने पत्करला. महामुंबई वृत्तान्तने याबाबतची बातमी प्रसिद्ध केल्यानंतर हा ध्वज लवकरात लवकर फडकविण्याची लगबग सुरू झाली. अखेर बुधवारी संध्याकाळी हा ध्वज डौलाने फडकविण्यात आला.