Navi Mumbai International Airport : ठाणे : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण ८ ऑक्टोबरला केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या विमानतळाच्या लोकार्पणास उपस्थित राहण्याची शक्यता आहे. विमानतळ तयार झाल्याने आता ठाणे, रायगड जिल्ह्यातील नागरिकांना विमानतळ गाठणे सुलभ होणार आहे. परंतु त्यासाठी कोणते रस्ते उपलब्ध आहेत जाणून घ्या, या बातमीतून.

नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारले जात आहे. हा प्रकल्प १,१६० हेक्टर क्षेत्र व्यापतो आणि पाच टप्प्यात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचा पहिला टप्पा २०२५ अखेर पर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित असून त्याद्वारे दरवर्षी सुमारे २० दशलक्ष प्रवाशांना सेवा देण्यात येणार आहे तसेच प्रकल्प २०३८ मध्ये पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर दरवर्षी सुमारे ९० दशलक्ष प्रवाशांना सेवा देण्याचे सरकारचे नियोजन आहे. विमानतळ प्रकल्पाचे महत्व विचारात घेता विमानतळाच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील स्थानिक क्षेत्रातील विकासाचे आणि पायाभूत सुविधांचे धोरणात्मक नियोजन केले जाणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यास ठाणे, कल्याण, भिवंडी, डोंबिवली इत्यादी भागातील प्रवाशांना त्याचा मोठा दिलासा मिळणार आहे. त्यासाठी महानगर प्रदेश क्षेत्रातील विविध भागांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडले जाणार आहे.

नामकरणावरून वाद

– विमानतळाला माजी खासदार दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव दिले जावे अशी मागणी भूमिपूत्रांची आहे. त्यासाठी येथे आंदोलनही झाले. भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी त्यासाठी मोठ्या आंदोलनाची तयारी देखील केली आहे. त्यामुळे या विमानतळाच्या उद्घाटनापूर्वी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अदानींची पाहणी

– नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहाणी नुकतीच अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी केली. त्यांच्यासोबत इतर काही अधिकारी होते. अदानी विमानातून विमानतळाच्या धावपट्टीवर उतरले. त्यावेळी त्यांनी विमानतळाच्या कामाचा आढावा घेतल्याचे कळते आहे. यापूर्वी देखील मार्च महिन्यात गौतम अदानी यांनी विमानतळाची पाहाणी केली होती.

काय आहे प्रकल्प?

– २०१६ मध्ये नवी मुंबई विमानतळ विकसित करण्यासाठी सिडकोने जागतिक स्तरावर निविदा मागविली होती. या विमानतळाच्या विकासासाठीचा करार २५ ऑक्टोबर २०१७ रोजी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (एमआयएएल) यांना देण्यात आला. यानंतर एमआयएएल आणि सिडको यांनी एकत्र येऊन नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडची (एनएमआयएएल) स्थापना केली. या संस्थेमार्फत नवी मुंबईतील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे विकास, बांधकाम, संचालन आणि देखभाल यांची जबाबदारी सांभाळली जाणार आहे. हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) पद्धतीने, डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट अँड ट्रान्स्फर या तत्त्वावर राबविण्यात येत आहे. एनएमआयएएलमधील ७४ टक्के भांडवल एमआयएएलकडे असून उर्वरित २६ टक्के भांडवल सिडकोकडे आहे. एप्रिल २०२१ मध्ये अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडने नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे व्यवस्थापन आपल्या ताब्यात घेतले.

विमानतळ गाठण्यासाठी कोणते मार्ग महत्त्वाचे

– ठाणे, पूर्व द्रुतगती महामार्ग – ठाण्यातून नवी मुंबई विमानतळ गाठण्यासाठी पूर्व द्रुतगती महामार्ग उत्तम पर्याय आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरून मुलुंड एरोली मार्गे अथवा ठाणे-कळवा-विटावा, दिघा मार्गाने, पुढे ठाणे-बेलापूर मार्गे, बेलापूर – उलवे रस्त्याने विमानतळ गाठता येऊ शकते.

– पश्चिम द्रुतगती महामार्ग- मुंबई पश्चिम द्रुतगती महामार्गाने जेव्हीएलआर, पूर्व द्रुतगती महामार्ग, वाशी खाडी पूल मार्गे पुढे उलवे मार्गे विमानतळ गाठता येईल.

– दक्षिण मुंबई- येथून अटल सेतू, उलवे बेलापूर मार्गे विमानतळ गाठता येईल.

– वसई, पालघर, मिरा रोड- या भागातील नागरिक फाऊंटन, गायमुख, घोडबंदर-ठाणे मार्गे, पूर्व द्रुतगती महामार्ग, ठाणे बेलापूर रोड येथून विमानतळावर पोहचू शकतात.

– नवी मुंबई- एरोल, दिघा भागातील रहिवासी पाम बीच रोडने नेरुळ-बेलापूर-उलवे मार्गे किंवा ठाणे बेलापूर रोडने बेलापूर- उलवे मार्गे जाऊ शकतील. खारघर, पनवेल भागातील रहिवासी शीव पनवेल मार्गे कळंबोली चौक, पनवेल उरण मार्गे विमानतळ गाठतील.

– कल्याण, डोंबिवली ते अंबरनाथ, बदलापूर – येथील रहिवासी शिळफाटा मार्गे शीव पनवेल महामार्ग, उलवे बेलापूर रोडने विमानतळ गाठू शकतात.

भविष्यात काय

– काही दिवसांपूर्वीच राज्य सरकाने ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उन्नत मार्ग यासाठी या अंदाजित ६ हजार ३६३ कोटी खर्चाच्या प्रकल्पाला मान्यता दिली आहे.

– काही मेट्रो मार्गिका देखील विमानतळापासून काही मीटर अंतरावर धावणार आहे. तसेच मुंबईत ते नवी मुंबई विमानतळ जलवाहतूकीचा पर्याय देखील भविष्यात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.