When Will First Flight Take Off from Navi Mumbai: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पाची चर्चा दोन दशकांपासून सुरू होती. अखेर बुधवारी (८ ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यामुळे अखेर आता इथून विमानाचे उड्डाण होईल, यावर शिक्कामोर्तब झाले. पीपीपी मॉडेलवर आधारित विमानतळ प्रकल्पाचा विकास करण्यात आला असून पहिला टप्प्यासाठी १९,६५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

आज विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर दोनपेक्षा अधिक विमानतळ असलेल्या लंडन, न्यूयॉर्क आणि टोक्यो सारख्या जगविख्यात शहरांमध्ये आता मुंबईचाही समावेश झाला आहे.

पहिल्या टप्प्यात नवी मुंबई विमानतळावर १ टर्मिनल, १ धावपट्टी व १० बस गेट आणि २९ एरो ब्रिजेस बांधण्यात आले आहेत. मात्र विमान उड्डाणासाठी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.

पहिले विमान कधी उड्डाण घेणार?

अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडचे सीईओ अरुण बन्सल यांनी सांगितले की, विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर सुरक्षेचे उपाय तपासण्यासाठी विमानतळाचा ताबा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे (CISF) देण्यात येईल. ३० ते ४५ दिवस त्यांचे काम चालेल. तसेच आम्हाला सीमाशुल्क आणि इमिग्रेशन पथकाचे काम पाहण्यासाठी जवळपास ४५ ते ६० दिवसांचा कालावधी लागेल.

विमानतळाचे कामकाज सुरळीत होण्याकरिता वरील कामे महत्त्वाची आहेत. त्याशिवाय पहिले उड्डाण घेण्यासाठी आणखी काही काळ लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सीईओ कॅप्टन बीव्हीजेके शर्मा आणि बन्सल यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पहिले व्यावसायिक उड्डाण घेण्याकरिता डिसेंबर २०२५ उजडू शकते.

कोणकोणत्या एअरलाईन्स इच्छुक?

एअर इंडिया, आकासा एअर आणि इंडिगो या तीन कंपन्यांनी त्यांच्या काही सेवा नवी मुंबई विमानतळावर हलविण्यासाठीचा करार केला आहे. मागच्या महिन्यात एअर इंडियाने इथून २० विमानांचे प्रस्थान (४० एअर ट्राफिक मुव्हमेंट) करण्याचे मान्य केले आहे. पहिल्या टप्प्यात भारतातील १५ शहरांत उड्डाण केले जाणार आहे. २०२६ च्या मध्यापर्यंत एअर इंडिया दिवसाला ५५ उड्डाण घेईल. ज्यात पाच आंतरराष्ट्री फ्लाईटचा समावेश असेल.

सुरुवातीच्या एका महिन्यासाठी उड्डाणे सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत सुरु असतील. कोणती विमान कंपनी उड्डाणे घेईल याविषयी स्पष्टता नसली तरी इंडिगो कंपनीचे विमान येथून पहिल्यांदा आकाशात झेपावेल असे बोलले जात आहे.