नवी मुंबई – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाची घटिका काही तासावर आली असून उद्घाटनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोंदींसह देशभरातील अनेक मान्यवर तसेच विविध क्षेत्रातील व्हीव्हीआयपी या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. दरम्यान, विमानतळ परिसरात चोख सुरक्षाव्यवस्था निर्माण केली असता कार्यक्रमाच्या स्थळी कोणतीही आरोग्यसुविधेची आवश्यकता भासल्यास नवी मुंबई महापालिकेची आरोग्यसुविधा सज्ज करण्यात आली आहे. तसेच, विमानतळ परिसरात नवी मुंबई महापालिकेकडून रुग्णवाहिकांची सुविधा देखिल तैनात करण्यात आली आहे. तर, पालिकेकडून जवळपास ७ रुग्णवाहिकांची सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नवी मुंबईचे विमानतळ असलेल्या परिसरात अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशी रुग्णालये पनवेल व उलवे परिसरात नाहीत. आजच्या कार्यक्रमाला आणि पुढील काही दिवस या परिसरात देशातील अनेक व्हीव्हीआयपी उपस्थित राहणार आहेत. या व्हीव्हीआयपींसाठी अत्यावश्यक आरोग्यसुविधेची व्यवस्था करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या मदतीने विमानतळापासून काही अंतरावर असलेल्या नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात राखीव बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. आजच्या कार्यक्रमाला देशभरातून विविध राजकीय मान्यवर तसेच पदाधिकारी त्याचबरोबरच शासनातील मोठे अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी आरोग्यसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेची मदत घेतली जात आहे.
उलवे नोडजवळच होत असलेल्या या विमानतळाच्या परिसरात व पनवेल महापालिका हद्दीत अत्याधुनिक आरोग्यसुविधेची वाणवा आहे. त्यामुळे अत्याधुनिक सुविधेसाठी अपोलो रुग्णालयात खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मागील काही दिवसापासून नवी मुंबई महापालिकेच्यावतीने अग्निशमन विभागाची सुविधाही विमानतळस्थळी तैनात करून दिली असल्याचे चिक्ष आहे.
नवी मुंबई विमानळाच्या उद्घाटनाच्या ठिकाणी मागील दोन दिवसापासून नवी मुंबई महापालिकेकडून ६ रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे उद्घाटनाच्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान मोदी यांच्यापासून अनेक व्हीव्हीआयपी व्यक्ति उपस्थित राहणार असल्याने नवी मुंबई महापालिकेच्या मदतीने अपोलो रुग्णालयातही राखीव खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.-डॉ. प्रशांत जवादे, मुख्य वैद्यकीय अधिकारी ,नवी मुंबई महापालिका
नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाच्यादृष्टीने शहरात स्वच्छता तसेच सापसफाईबरोबरच विमानतळाच्या उद्घाटनाच्या ठिकाणी अग्निशमन विभागामार्फत २ अग्निशमन गाड्या तसेच कर्माचाऱ्यांची सुविधा देण्यात आली आहे.- शिरीष आरदवाड, शहर अभियंता व अग्निशमन विभाग अधिकारी