लोकसत्ता प्रतिनिधी

पनवेल : तळोजा पंचानंद नगर वसाहत आणि खारघर वसाहतीमधील सेक्टर २६ हा परिसर एका उड्डाणपुलाने जोडण्याच्या उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू होणार आहे.

अनेक वर्षांपासून या पुलाचे बांधकाम थांबले होते. नियोजनात असूनही जमिनीच्या वादामुळे हे काम रखडले. सप्टेंबर महिन्यात तळोजा नदीवरून आणि दिवा-पनवेल रेल्वे मार्गावरून बांधल्या जाणाऱ्या उड्डाणपुलाला सिडको मंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर तळोजावासीयांची अनेक वर्षांची प्रतीक्षा आता संपण्याची चिन्हे आहेत. पुढील वर्षभरात या पुलाचे बांधकाम सुरू होईल. यामुळे तळोजा पंचानंदनगर वसाहतीमधील रहिवाशांना काही मिनिटांत उड्डाणपूल ओलांडून थेट खारघर वसाहतीमध्ये जाता येणार आहे.

आणखी वाचा-नवी मुंबई महापालिका शाळांच्या विद्यार्थ्यांना ‘इस्रो’ची सहल

तळोजा पंचानंद नगर वसाहतीमध्ये ३० हजारांहून अधिक घरे सिडको मंडळ बांधत आहे. याव्यतिरिक्त खासगी विकासकांचे बांधकाम जोरदार सुरू आहे. तळोजा ते हार्बरच्या रेल्वेमार्गापर्यंत पोहोचण्यासाठी मेट्रोतून प्रवास करावा लागतो. किंवा नवी मुंबई महापालिकेच्या बसने खारघर आणि बेलापूरकडे जाता येते. मात्र सिडकोच्या परिवहन विभागाच्या नियोजनानुसार तळोजा वसाहतीमधून एक पूल ओलांडल्यानंतर थेट खारघरमध्ये जाता येणार आहे. उड्डाणपुलाच्या कामासोबत पोहच रस्ता, पावसाळी पाण्यासाठी आणि नदीचे पाणी जाण्यासाठीची सोय करण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात सिडको मंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या कामाला मान्यता मिळाली आहे. हे काम मे. जे. एम. म्हात्रे इन्फ्रा प्रा. लिमिटेड या कंपनीला ९६ कोटी ४६ लाख ५३ हजार ८४१ रुपयांना दिले आहे. सध्या या कामाची इतर विभागांकडून परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

खारघर आणि तळोजा पंचानंद नगर या दोन्ही वसाहती सिडको मंडळाने वसविल्या. तळोजा पंचानंद नगर ही वसाहत १३२ हेक्टर जमिनीवर वसविण्यात आली आहे. तळोजामधील मेट्रोमुळे येथील नागरीकरण वेगाने होत आहे. मेट्रोच्या विस्तारासह विविध पायाभूत सुविधांची कामे आजही वसाहतमध्ये सुरू आहेत. सिडकोने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत वसाहतीमध्ये महागृहनिर्माणाचे काम हाती घेतले असून सेक्टर- २८, २९, ३१, ३४, ३६, ३७ आणि ३९ येथे ही बांधकामे सुरू आहेत.

आणखी वाचा-करंजा-कोंढरीमध्ये २५ दिवसांतून एकदाच पाणी; ग्रामस्थांमध्ये संताप, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आंदोलन

सिडको इन्फ्रास्ट्रक्चर विकासासाठी कटिबद्ध आहे. पेणधर ते खारघर वसाहत या दरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर सुरू होईल. या कामाची विविध परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. -प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वसाहतींमध्ये दळणवळणाचे विविध पर्याय

खारघर ते तळोजा या दोन वसाहतींमधील दळणवळणांचे विविध पर्याय रहिवाशांना मिळावेत यासाठी मुंब्रा-पनवेल महामार्गावर एक भुयारी मार्गासह, दिवा-पनवेल रेल्वे मार्गावर तळोजा नदीवर पुलाचे बांधकाम केले जात आहे. मुंब्रा-पनवेल महामार्गावरील पेणधर फाटा येथून नवीन बांधण्यात येणारा उड्डाणपूल खारघर वसाहतीमधील सेक्टर २६ ला जोडला जाणार आहे. सध्या पेणधर येथे सिडको मंडळाने २०१८ साली पुलाचे काम हाती घेतले आहे. हे काम जून २०२४ मध्ये पूर्ण होईल.