कंत्राटदाराला देयक अदा करूनही काम अर्धवट राहिल्याने रहिवाशांमध्ये तीव्र संताप

नवी मुंबई : करोनाकाळात कामे न करता देयके अदा केल्याचे काही प्रकार उजेडात येत असून असाच प्रकार घणसोलीतील एका पादचारी पुलाच्या बाबतीत घडला आहे. घणसोली सेक्टर ६ व ७ दरम्यान जोडणाऱ्या पादचारी पुलाचा विसर प्रशासनाला पडला असून हे काम अर्धवट अवस्थेत पडून आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

करोनाकाळात उद्यानांची देखभाल दुरुस्ती न करता देयक लाटल्याचा प्रकार समोर आला होता. तसेच काही प्रकार इतर कामांतही घडल्याचे दिसत आहेत. घणसोलीत सेक्टर ६ व ७ मधून एक मोठा नाला गेला आहे.

सेक्टर ६ व ५ ला जोडणारा एक पादचारी पूल नाल्यावर आहे. मात्र सेक्टर ७ ते १० परिसरात जाण्यासाठी नागिरकांना मोठा वळसा घालून जावे लागते. हा त्रास कमी व्हावा यासाठी सेक्टर ६ व ७ दरम्यान एक पादचारी पूल व पादचारी मार्ग करण्याचे काम करोनाकाळात पालिका प्रशासनाने  हाती घेतले होते. मात्र गेली अकरा महिने हे काम अर्धवट पडून आहे.  या पादचारी मार्गावर दोन्ही बाजूंनी झाडे व गवत वाढले आहे. लोखंडी पुलाचा फक्त सांगाडा बसिवण्यात आला आहे. तसेच प्रकाश व्यवस्था या मार्गावर व नाल्यावर करण्यात आलेली नाही. हे सर्व काम अर्धवट सोडून देण्यात आले आहे. गेली अकरा महिने या ठिकाणी कोणतेही काम झालेले नाही.  त्यामुळे या कामात कोणतेही नियोजन नसल्याचे येथील रहिवासी कमल नाईक यांनी सांगितले.

पालिकेच्या अभियंत्यांना विचारणा केली असता काम अर्धवट असल्याचे  त्यानी मान्य केले असून लवकरच हे काम पूर्ण करून पथदिवे बसविण्याबाबत विद्युत विभागाला कळवण्यात येईल असे सांगितले. मात्र या कामात विद्युत दिव्यांचा समावेशच नसल्याचे समोर येत आहे. याबाबत विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण गाढे यांनी निविदेत उल्लेख असले तरच आम्ही विद्युत खांबे लावतो असे सांगितले.

कामाचा विसर

अर्धवट राहिलेल्या कामाचा विसर पडल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सबंधित अधिकाऱ्याचा निषेध नोंदवला आहे.  याबाबत मनसचे संदीप गलुगडे यांनी सांगितले की, काम अर्धवट असेल तर आज ना उद्या ते होईल. मात्र कामाचा विसरच पडला हे भयंकर आहे.  या झालेल्या कामाची काही छायाचित्रे दाखवल्यानंतर अभियंत्यांनाही  हे कामाचे ठिकाण ओळखता आले नाही.

मद्यपी, जुगारींसाठी सुरक्षित जागा

या पादचारी मार्गावर  झाडांच्या फांद्यांची छाटणी नियमित होणे गरजेचे आहे. मात्र ती होत नाही. तसेच गवतही मोठया प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे दिवसाही नागरिक या मार्गाने पायी जाताना घाबरत आहेत.

रात्रीच्या वेळी तर  प्रवास करणे अशक्यच आहे. या मार्गावर मद्यपी व जुगाऱ्यांचे अड्डे झाले असल्याची खंत येथील रहिवासी माया जगताप यांनी व्यक्त केली आहे.  पादचारी पुलावर छत टाकण्यासाठी सांगाडा बसवला आहे, मात्र त्यावर अद्याप पत्रे टाकण्यात आले नाहीत असे पांडुरंग झाडबुके  यांनी सांगितले.