कला सारथी आर्ट सोसायटीतर्फे बेलापूर येथे गणेशकृती आणि प्र्दशन कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवी मुंबईतील विख्यात सुलेखनकार अच्युत पालव यांनी कॅलिग्राफीच्या वेगवेगळ्या प्रकारांचे प्रात्यक्षिक दाखविले. तसेच शिल्पकार भगवान रामपुरे यांनी आध्यात्मिक ओशो विजय मोहन यांचे हुबेहूब शिल्प साकारून शिल्पकलेचे काही पैलू प्रशिक्षणार्थीसमोर सादर केले.
यावेळी सुलेखनकार अच्युत पालव म्हणाले की, आज अक्षर सुलेखनाची बऱ्यापैकी प्रगती झाली आहे. पूर्वी सुलेखनकलेकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नव्हते. मात्र आजचा तरुण त्याकडे आकर्षित होत आहे. पण ही कला एका विशिष्ट पद्धतीने साकारली जात आहे. सुलेखनकारांनी चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करायला हवा. कोणतीही कला शिकताना प्राथमिक अवस्थेत अडचणी येतात. जन्मजात कोणी निपुण नसतो. त्यामुळे प्रशिक्षणाìथनी दडपण बाळगता कामा नये. दडपणाखाली असताना कोणतीही कला चांगल्या प्रकारे सादर करता येणार नाही. कला साकारण्याचा मुक्त विचार कराल तर कचऱ्यातूनही चांगली कॅलिग्राफी साकारता येईल असे पालव म्हणाले. नवी मुंबईत शिल्पकलेचा फार प्रचार झालेला दिसत नाही. मुंबई आणि इतर स्मार्ट शहरांमध्ये शिल्पकलांचे प्रदर्शन मोठय़ा प्रमाणात भरवले जाते. परंतु नवी मुंबई याला अपवाद आहे. त्यामुळे नवी मुंबईतूनही चांगल्या दर्जाचे शिल्पकार घडविण्यासाठी कलासारथीच्या उपक्रम आहे. यातून जास्तीत जास्त शिल्पकार घडावेत याच हेतून ही कार्यशाळा घेण्यात आली असल्याचे शिल्पकार भगवान रामपुरे म्हणाले. यावेळी सुमारे बाराशे नागरिक उपस्थित होते. कार्यशाळेत १० वर्षांखालील मुलांची संख्याही लक्षणीय होती.
छत्रीवर नक्षीकाम
कला साधना आर्ट अ‍ॅकॅडमी ऐरोली व दत्ता मेघे कल्चर अ‍ॅकॅडमीतर्फे छत्रीवर चित्र रंगविणे या कार्यशाळेचे सोमवारी  राधिकाबाई मेघे विद्यालय येथे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत सुलेखनकार विनोद महाबळे यांनी छत्री रंगविण्याची सुंदर प्रात्यक्षिके सादर केली. कार्यशाळेत १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेत उत्तम कला सादर करणाऱ्या दहा विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली, तर उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात आले.