News Flash

मेंदूशी मैत्री : सतत विद्यार्थी

नोकरी मिळवण्यासाठी किंवा व्यवसाय उभा करण्यापुरतं शिक्षण घ्यायचं, ही जुनी समजूत आहे

श्रुती पानसे contact@shrutipanse.com

‘बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरू’ अशी ग. दि. माडगुळकरांची एक कविता आहे. समाजातला प्रत्येक घटक आपलं सहज शिक्षण करत असतो. प्रत्येकाचा संबंध समाजाशी असतो. म्हणूनच समाजाला समजून घ्यायला हवं. त्यासाठी त्यात मिसळायला हवं.

‘सध्याचा काळ ज्ञानाधारित आहे’, ‘हे माहितीचं युग आहे’, ‘ज्याच्याकडे आधुनिक शिक्षण असेल, त्याला आयुष्यात प्रगती करण्याची शंभर टक्के संधी आहे’ अशी विधानं आपण सतत ऐकत-वाचत असतो. तसेच करिअरच्या अतोनात संधी आता उपलब्ध आहेत. शिवाय ज्या महाराष्ट्रात आपण राहतो, तो तर शिक्षणासाठी पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. अन्य राज्यांतले, परदेशांतलेही विद्यार्थी महाराष्ट्रात येऊन शिकतात. अशा वातावरणात आपणही मागे राहू नये, अशी इच्छा कोणाचीही असणारच!

शहरांमध्ये व मोठय़ा गावांमध्ये अनेक प्रकारचे नवे अभ्यासक्रम चालतात. फोटोग्राफीपासून संगणकापर्यंत, स्क्रिप्ट रायटिंगपासून अभियांत्रिकी, व्यवस्थापनशास्त्रापर्यंत सर्व काही शिकवणाऱ्या संस्था आणि व्यक्ती असतात. शिकण्याची इच्छा असेल तर आपण कोणत्याही वयात काहीही शिकू शकतो, अशी परिस्थिती आहे. नोकरदारांसाठी शैक्षणिक कर्जाची सोय असते. अशा वातावरणात कोणत्याही वयाच्या, कोणत्याही पदावरच्या माणसाला शिकता येईल/ राहून गेलेलं शिक्षण पूर्ण करता येईल, अशा छान संधी आसपास आहेत. आपलं लक्ष्य ठरवून ते साध्य करता येईल.

नोकरी मिळवण्यासाठी किंवा व्यवसाय उभा करण्यापुरतं शिक्षण घ्यायचं, ही जुनी समजूत आहे. आता नोकरी मिळाली की प्रश्न संपला, असं वातावरण नाही. नोकरीतही सतत नवीन गोष्टी, नवीन तंत्रं शिकत राहावी लागतात. अन्यथा मागे पडण्याचा धोका असतो. मिळालेली नोकरी टिकवून ठेवण्यात धन्यता मानण्याचाही काळ गेलाच. कितीही पगार असला व कामात समाधान असलं, तरी नव्या संधी प्रत्येकाला हव्या असतात हे वास्तव आहे.

यासाठी वयाच्या निरनिराळ्या टप्प्यांवर स्वत:चा कौल घ्यायलाच हवा. आपल्याला नक्की काय करायचं आहे, आणखी काय करायचं, असे प्रश्न आधी विचारायला पाहिजेत. शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थीदशा संपते, असं समजायचं कारण नाही. ती कायम चालूच असते.. चालू असायला हवी. तरच न्यूरॉन्सची नव्यानं बांधणी होणार आहे!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2019 2:58 am

Web Title: about student life continuous student studentlife study zws 70
Next Stories
1 चर्चा का आवश्यक?
2 विश्वातले कृष्णपदार्थ
3 घर शाळेत आणि शाळा घरात
Just Now!
X