डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com

एकाच प्रकारचं काम करून माणसांना कामाचा कंटाळा येतो. मानसिक- बौद्धिक थकवा येतो. याचं कारण कदाचित आपण मेंदूचा डावा आणि उजवा यापैकी केवळ डावा भागच जास्त वापरतो, हे आहे का? आपल्याला थकवा येतो तसा मुलांनाही अभ्यासामुळे थकवा येतो का?

मेंदूच्या डाव्या भागात अशी काही क्षेत्रं असतात, की जिथे भाषा, गणित, तर्क, विश्लेषण असे व्यवहार चालतात.  तर मेंदूच्या उजव्या भागातल्या क्षेत्रांमध्ये भावना, कला, रंग, संगीत, उत्स्फूर्तता असे काही व्यवहार चालतात.

मेंदूला इलेक्ट्रोड्स लावून स्क्रीनवर पाहिलं तर मेंदूच्या कोणत्या भागात रक्तप्रवाह तीव्र आहे हे समजतं. यावरून शास्त्रज्ञांच्या हे लक्षात आलं आहे की मेंदू विशिष्ट विचार करत असताना कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये उद्दीपन होत आहे. यावरून वरील प्रकारचे अनेक निष्कर्ष काढले गेले आहेत. विविध संदर्भात, विविध विषय घेऊन हे संशोधन चालू आहे.

डाव्या भागातल्या आणि उजव्या भागातल्या क्षेत्रांनुसार वेगवेगळी कामं चालतात, असं लक्षात आलं तेव्हाच ‘होल ब्रेन लìनग’ (whole brain learning )  हा विचार पुढे आला. शिक्षण म्हणजे वाचन, लेखन, पाठांतर, प्रश्नांची उत्तरं लिहिणं, गणितं सोडवणं, इ. ही सर्व कामं डाव्या भागातल्या क्षेत्रांमध्ये चालणारी कामं आहेत. आपल्या लक्षात येईल की नेहमीच्या वर्गामध्ये जे शिकणं- शिकवणं चालतं त्यात खडू-फळा, वही-पेन यांना फार महत्त्व आहे. वास्तविक तार्किकता हे डाव्या मेंदूचं काम. पण विचार करणं, निष्कर्ष काढणं, प्रश्न विचारणं हे होत नाही, डाव्या मेंदूलाही पूर्ण न्याय दिला जात नाही.

या प्रकारच्या शिकण्याला मेंदूतल्या उजव्या क्षेत्रांची जोड हवी. अभ्यासाचा तास वेगळा, कलेचा वेगळा असं आपल्याकडे असतं. यापेक्षा अभ्यासात कला, चित्र, भावना, रंग या गोष्टी आणल्या पाहिजेत. तर ते ‘होल ब्रेन लìनग’ होईल. डाव्या आणि उजव्या क्षेत्रांचा समन्वय झाला पाहिजे. मुलांना येणारा अभ्यासाचा कंटाळा कमी होईल.

ऑफिसमध्ये दिवसभर बसून काम करूनही कंटाळा, थकवा येतो. याचीही अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक कारण म्हणजे एकसुरी काम. यासाठी गुगलसारख्या मोठय़ा ऑफिसेसमध्ये कर्मचाऱ्यांच्या विरंगुळ्याचा विचार केला गेला. उजव्या भागाला उद्दीपन मिळेल अशा गोष्टी केल्या तर कामाचा उत्साह नक्की टिकून राहतो.