सुनीत पोतनीस

नैसर्गिक संसाधने विपुल प्रमाणात असूनही अनेक दशके चालत आलेल्या वांशिक विद्वेष, धार्मिक विद्वेष, भ्रष्टाचार आणि कुशासन यामुळे स्वातंत्र्य मिळवूनही नवनिर्मित युगांडा हा जगातल्या अत्यंत गरीब देशांमध्ये गणला जातो. येथील ४० टक्के जनता दारिद्रय़रेषेखाली जगते आहे.

युगांडाच्या संसदेतले ४४९ लोकप्रतिनिधी, खासदारांचे उत्पन्न सामान्य आर्थिक परिस्थिती असलेल्या नागरिकाच्या उत्पन्नाच्या साठपट आहेच, पण त्यांचे राष्ट्राध्यक्षही त्याच पंक्तीतले! या भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधींविरोधात निदर्शने करणाऱ्यांनी त्या भ्रष्टाचाऱ्यांची प्रतीके म्हणून डुकराची दोन पिल्ले संसदेत सोडली होती! पुढे या निदर्शकांना शिक्षा झालीच, पण तेव्हापासून खासदारांसाठी ‘एम्-पिग्ज’ हा शब्द प्रचलित झाला. राष्ट्राध्यक्ष योवेरी मुसेवेनी यांनी राष्ट्राध्यक्षपदाची कालमर्यादा राज्यघटनेतून रद्दबातल करण्यासाठी सर्व खासदारांना हजारो डॉलर्स वाटल्याचे बोलले जाते!

२०१४ मध्ये युगांडा सरकारने ‘समलिंगीविरोधी कायदा’ मंजूर करून वादंग ओढवून घेतला. युगांडाचे प्रमुख वर्तमानपत्र ‘रोलिंगस्टोन’च्या एका अंकात पहिल्या पानावर १०० समलिंगी व्यक्तींची नावे त्यांची छायाचित्रे व राहण्याच्या ठिकाणांसह प्रसिद्ध केली होती, आणि त्यावर मथळा होता : ‘हँग देम’! यानंतर अनेक समलिंगी व्यक्तींवर जीवघेणे हल्ले झाले. परंतु पुढे मानवी हक्क संघटना व जागतिक बँक वगैरे आंतरराष्ट्रीय संघटनांनी या समलिंगीविरोधी कायद्याचा निषेध करून दबाव आणल्यावर युगांडा सरकारने हा कायदा रद्द केला.

अनेक भिन्न वंशीय जमाती आणि भिन्न संस्कृतींची मोट बांधलेल्या युगांडामध्ये चाललेले सततचे संघर्ष, बदलती राजकीय व्यवस्था, भ्रष्टाचार हे सर्व असूनही योवेरी मुसेवेनी यांच्या कारकीर्दीत अर्थव्यवस्था आणि विकासदर प्रगतिपथावर आहेत. सव्वाचार कोटी लोकसंख्येच्या युगांडातील जनता ८५ टक्के ख्रिस्ती आणि १३ टक्के इस्लाम धर्मीय आहे. देशाच्या राजभाषा इंग्रजी आणि स्वाहिली असल्या तरी, लुगांडा ही भाषा अधिक प्रचलित आहे. युगांडाची अर्थव्यवस्था कॉफी, कापूस, सिमेंट आणि साखर यांच्या निर्यातीवर अवलंबून आहे.

sunitpotnis94@gmail.com