सुनीत पोतनीस

टोगो प्रजासत्ताकाच्या अध्यक्षपदी ३८ वर्षे चिकटून राहिल्यावर ग्नासिंग्बे याडेमा यांचा २००५ साली मृत्यू झाला. त्यानंतर लष्कराने सत्ता हातात घेऊन ग्नासिंग्बे याडेमांचा मुलगा फाऊर ग्नासिंग्बे याला राष्ट्राध्यक्षाच्या गादीवर बसवले. पण यामुळे आंतरराष्ट्रीय दबाव येऊन फाऊरला सार्वत्रिक निवडणुकांचे नाटक करावे लागले. या निवडणुकीत शेकडो बळी गेले. पुढच्या काळात २०१०, २०१५ व २०२० या वर्षांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्येही फाऊर यालाच बहुमत मिळून सध्या फाऊर यांच्या कडेच टोगोचे राष्ट्राध्यक्षपद आहे. २०१९ साली फाऊरने देशाच्या राज्यघटनेतच हवा तसा बदल करून घेऊन स्वत:ची २०३० पर्यंत राष्ट्राध्यक्षपदी राहण्याची व्यवस्था केली. यावरून बरेच वादंग माजले, आंदोलने झाली. अर्थातच फाऊरने ती सर्व दडपून टाकली.

तीस वांशिक जमातींची टोगोमधील मूळची वस्ती असून, टोगोमध्ये सध्या राहणाऱ्या परकीय लोकांमध्ये बहुतांश फ्रेंच आहेत. याशिवाय ब्राझिलियन आणि पोर्तुगीजांचीही तुरळक वस्ती आहे. व्यापाराच्या निमित्ताने हे लोक इथे स्थायिक झाले. टोगोमध्ये अरब व युरोपियन लोकांना १९व्या शतकापर्यंत मुख्य आकर्षण होते ते गुलामांच्या व्यापाराचे आणि हत्ती व गेंडय़ाची शिकार करून हस्तिदंत आणि गेंडय़ाच्या शिंगांची चोरटी निर्यात करण्याचे! हे दोन्ही व्यापार पुढे कायद्याने बंद करण्यात आले. हस्तिदंत आणि गेंडय़ाची शिंगे यांची चोरटी निर्यात ही सर्व आशियाई देशांमध्ये दागिने आणि औषधांमध्ये वापरण्यासाठी होत असे.

टोगोमध्ये फॉस्फेट्सचे मोठे साठे आहेत. खत-उत्पादनासाठी फॉस्फेट्सला मागणी असल्यामुळे टोगो जगातला सर्वात मोठा फॉस्फेट्स उत्पादक व निर्यातदार आहे. टोगोची अर्थव्यवस्था तिथे मुबलक पिकणाऱ्या कोको, कॉफी, भुईमूग व कापसाच्या निर्यातीवर अवलंबून आहे. टोगोमधील सततच्या राजकीय व वांशिक संघर्षांमुळे अनेक नैसर्गिक संसाधने असूनही देशात औद्योगिक व व्यावसायिक विकास झालेला नाही. प्रत्येक निवडणुकीत हिंसाचारात ४००-५०० लोक बळी जातात, तसेच राष्ट्राध्यक्ष विरोधकांना तुरुंगात टाकतात. त्यामुळे इथली राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. ७१ लाख लोकसंख्येच्या या देशात आफ्रिकन जमातींचा पारंपरिक धर्म पाळणारे ५१ टक्के, ख्रिस्ती ३५ टक्के आणि इस्लामधर्मीय १३ टक्के लोक आहेत. टोगोमध्ये अनेक गावांत १७व्या शतकातल्या किल्ल्यांसारखी, विशिष्ट प्रकारची गोल छपरांची घरे आहेत. युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांमध्ये ती समाविष्ट आहेत.

sunitpotnis94@gmail.com