News Flash

मनोवेध : मेंदूतील लोकशाही

आपला मेंदू म्हणजे अनेक पक्षांतील माणसे एकत्र बसून वादचर्चा करतात तशी लोकसभा आहे.

(संग्रहित छायाचित्र)

– डॉ. यश वेलणकर

माणसाच्या मेंदूत एकाच वेळी पेशींच्या अनेक जोडण्या अस्तित्वात असतात. त्याचमुळे मन चंचल असते. या जोडण्यांतून परस्परविरोधी विचारही निर्माण होत असतात. माणसाच्या मेंदूत कुणीही एक राजा नसतो, तर अब्जावधी मेंदू पेशींची लोकशाही असते. त्याचमुळे एक व्यक्ती काही वेळ सजग असते, काही वेळ विचारात हरवून जाते. ती एखाद्या प्रसंगात स्वार्थी वाटते आणि दुसऱ्या प्रसंगी दिलदार भासते. आइस्क्रीम पार्लरसमोरून जाऊ लागल्यानंतर ‘आइस्क्रीम खाऊ या’ असा एक विचार येतो. त्यानंतर ‘नको, घशाला त्रास होईल’ असा विचार असलेली दुसरी जोडणी सक्रिय होते.

आपला मेंदू म्हणजे अनेक पक्षांतील माणसे एकत्र बसून वादचर्चा करतात तशी लोकसभा आहे. मग निरोगी माणसाच्या मेंदूच्या या लोकसभेत सत्ताधारी कोण आणि विरोधी पक्ष कोण, आपण निर्णय कोणत्या विचारानुसार घेतो, हे कसे ठरते. मेंदू संशोधनानुसार, मेंदूतील सत्ताधारी पक्ष सतत बदलत असतो. माणूस निर्णय घेतो त्या वेळी नक्की काय घडते, हे पाहणारे अनेक प्रयोग होत आहेत. त्यानुसार, कोणत्या विचाराला महत्त्व देऊन कृती केली जाते हे अनेक घटकांवर अवलंबून असते.

त्यातील एक घटक म्हणजे- मेंदू किती थकला आहे, हा असतो. माणसाला काय हितकारक आणि काय अहितकारक हे माहीत असले, तरी अहितकारक विचाराला महत्त्व द्यायचे नाही ही क्षमता मेंदू थकला असेल त्या वेळी कमी होते. अशा वेळीच सिगरेट वाईट आहे हे माहीत असूनही झुरका मारला जातो. माणूस ताजातवाना असेल तेव्हा त्याच्यासमोर फळे आणि केक ठेवले तर तो फळे निवडण्याची शक्यता अधिक असते. मात्र तोच माणूस थकला असताना फळे न खाता केक निवडतो. कदाचित मेंदू थकलेला असतो तेव्हा त्याला लगेच साखर किंवा उत्तेजना हवी असते म्हणून असे निर्णय घेतले जातात. पण दूरचा विचार केला तर ते त्रासदायक ठरतात.

अहितकारक गोष्टी माहीत असूनही केल्या जातात, त्या वेळी सत्त्वावजय चिकित्सेनुसार धृती दुबळी झालेली असते. धृतीसाठी मेंदूला अधिक ऊर्जा लागते, ती कमी झाल्याने असे होते. ती दुबळी होऊ द्यायची नसेल, तर मेंदूचा थकवा टाळायला हवा. त्यासाठी सतत विचारात न राहता, आपले लक्ष अधूनमधून वर्तमान क्षणात आणायला हवे.

yashwel@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 12:08 am

Web Title: article on democracy in the brain abn 97
Next Stories
1 कुतूहल : सजीवांतील ध्वनीय संकेत
2 मनोवेध : मेंदूतील चाकोऱ्या
3 कुतूहल : सजीवांतील रासायनिक संदेश
Just Now!
X