सर्व प्रकारच्या परिसंस्थांमध्ये प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे हरित वनस्पती सूर्यप्रकाशातील ऊर्जा ग्रहण करून तिचे अन्नरूपी रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात. परंतु ही ऊर्जा एका जागी स्थिर न राहता प्रत्येक परिसंस्थेतील अन्नसाखळीच्या माध्यमातून प्रत्येक सजीव घटकापर्यंत अन्नाच्या रूपात वितरित केली जाते. प्रत्येक परिसंस्थेत अन्नसाखळीची सुरुवात ही हरित वनस्पतींपासून होते. या रचनेतील पहिली पोषण पातळी (ट्रॉफिक लेव्हल) या स्वयंपोषी वनस्पतींची असते. स्वत:साठी आणि परिसंस्थेतील प्रत्येक सजीव घटकासाठी या अन्न तयार करतात, म्हणून यांना ‘प्राथमिक उत्पादक’ म्हणतात. शर्करेसारख्या कर्बोदकांच्या रूपातील हे अन्न या वनस्पती स्वत:च्या पेशींमध्ये सामावून (अ‍ॅसिमिलेशन) घेतात व यातील ऊर्जा स्वत:च्या वाढ आणि विविध क्रियांसाठी वापरतात.

adulterated sweets items eized at saptashrungi fort
सप्तश्रृंग गडावर साडेपाच लाखाचे भेसळयुक्त गोडपदार्थ जप्त
PSI Sanjay Sonawane, nagpur,
पीएसआय संजय सोनवणे म्हणतात, “मी पोलीस आयुक्तांना ओळखत नाही,” नेमका काय आहे प्रकार? जाणून घ्या…
how to make fish egg omelette Fish egg recipe in marathi
झटपट नाश्त्यासाठी बनवा “माशाच्या अंड्याचे ऑमलेट” लहान मुलंही खातील आवडीने
deep learning definition
कुतूहल : डीप लर्निग – सखोल शिक्षण म्हणजे काय?

यानंतर हरीण, गाय, ससे, हत्ती आणि अगदी माणूस यांसारखे दुसऱ्या पोषण पातळीवर असलेले सजीव पहिल्या पोषण पातळीवरील वनस्पतीचे भक्षण करून त्या वनस्पतींच्या शरीरात सामावलेली अन्नरूपी ऊर्जा (बायोमास) आपल्या शरीरात सामावून घेतात आणि आपल्या पोषणासाठी, शारीरिक हालचाली व इतर विविध क्रियांसाठी लागणारी ऊर्जा या अन्नातून मिळवतात. या प्राण्यांना प्राथमिक भक्षक असे म्हणतात. या प्राथमिक तृणभक्षकांना खाऊन आपली अन्नरूपी ऊर्जा मिळविणाऱ्या सजीवांना मांसभक्षक किंवा द्वितीय भक्षक म्हणतात. हे प्राणी तिसऱ्या पोषण पातळीवर असतात. या गटात वाघ, सिंह, कुत्रा, मांजर, गरुड आदींचा समावेश होतो. सूक्ष्मजीव, बुरशी, कवके इत्यादी सजीव हे प्राथमिक, द्वितीय, तृतीय आदी पोषण पातळ्यांवर असलेल्या सजीवांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृत शरीरातील सेंद्रिय घटकांचे असेंद्रिय संयुगात रूपांतर करतात. त्यांना अपघटक म्हणतात.

आता ही अन्नरूपी ऊर्जा एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे प्रवाहित होत असताना ‘थर्मोडायनॅमिक्स (उष्मागतिकी)’च्या दुसऱ्या नियमानुसार, या ऊर्जेची क्षमता कमी होत जाते. उदाहरणार्थ, प्राथमिक उत्पादक असलेल्या वनस्पतींची ऊर्जा क्षमता १००० किलो कॅलरीज् एवढी असेल, तर दुसऱ्या पोषण पातळीवर असलेल्या तृणभक्षकांना प्रत्यक्ष वापरायला मिळणारी ऊर्जा ही १०० किलो कॅलरीज् असेल. त्याचप्रमाणे तिसऱ्या पोषण पातळीवर असणाऱ्या मांसभक्षकांना प्रत्यक्ष वापरण्यासाठी मिळणारी ऊर्जा केवळ १० किलो कॅलरीज् असेल आणि अंतिमत: चौथ्या पोषण पातळीवरील भक्षकांना केवळ १ किलो कॅलरी एवढी ऊर्जा उपलब्ध असेल. यावरून एका पोषण पातळीवरून पुढील पोषण पातळीकडे ऊर्जा प्रवाहित होते तेव्हा जवळपास ९० टक्के ऊर्जा उष्णतेच्या रूपात आणि विविध प्रकारच्या शारीरिक क्रिया घडवून आणण्यासाठी ‘खर्च’ केली जाते.

– डॉ. संजय जोशी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org