22 September 2020

News Flash

मनोवेध : मेंदूचे अर्धगोल

शरीराच्या डाव्या भागातील स्नायूंना आज्ञा देणारी केंद्रे मेंदूच्या उजव्या भागात आणि उजव्या भागाची केंद्रे डाव्या भागात असतात.

संग्रहित छायाचित्र

– डॉ. यश वेलणकर

मेंदूचे डावा आणि उजवा असे दोन अर्धगोल असतात. या दोन्ही अर्धगोलांना जोडणारे ‘कॉर्पस कॅलोसम’ नावाचे तंतू असतात. निरोगी व्यक्तीचा संपूर्ण मेंदू एकजिनसीपणाने काम करीत असतो. मात्र मेंदूत काही विकृती असतील, तर एकजिनसीपणा हरवतो. आकडीच्या रुग्णात काही ठिकाणच्या पेशी वेगाने विद्युतधारा निर्माण करू लागतात. अशा वेळी शस्त्रक्रिया करून मेंदूतील काही भाग काढून टाकला जातो. मेंदूच्या दोन अर्धगोलांना जोडणाऱ्या तंतूंचा काही भाग असा काढून टाकला, तर त्याचे विचित्र परिणाम नंतर दिसून येऊ लागले. त्यामुळे ही शस्त्रक्रिया आता फारशी केली जात नाही. अशी माणसे एका हाताने त्यांच्या शर्टची बटणे लावत असतानाच, दुसरा हात लावलेली बटणे काढतो आहे असे होऊ लागले. म्हणजे एकाच वेळी दोन परस्परविरोधी आज्ञा मेंदूकडून दोन हातांना दिल्या जाऊ लागल्या. निरोगी व्यक्तीमध्ये असे होत नाही.

याचाच अर्थ रचनात्मक दोन अर्धगोल दिसत असले, तरी ते स्वतंत्रपणे काम करीत नाहीत. शरीराच्या डाव्या भागातील स्नायूंना आज्ञा देणारी केंद्रे मेंदूच्या उजव्या भागात आणि उजव्या भागाची केंद्रे डाव्या भागात असतात. त्यामुळे डाव्या मेंदूत इजा झाली तर शरीराची उजवी बाजू लुळी होते. मात्र मेंदूच्या अन्य ठिकाणी डाव्या व उजव्या भागातील कार्यात कोणता फरक आहे यावर बरेच संशोधन होत आहे. त्यानुसार उजव्या हाताने काम करणाऱ्या माणसाला शब्द मेंदूच्या डाव्या भागामुळे ऐकू येतात; पण त्यामध्ये विनोद असेल तर तो उजव्या भागाला समजतो. जाणवणारी परिस्थिती ही दोन्ही अर्धगोलांचा एकत्र परिणाम असली, तरी उजवा भाग अधिक दूरदर्शी आणि परस्परसंबंध जाणतो. तर डावा भाग तपशिलांत गुंतलेला असतो.

उजवा भाग प्रवासाची दिशा ठरवतो आणि डावा पुढचे पाऊल योग्य ठिकाणी पडते आहे याची काळजी घेतो. डाव्या भागाला तार्किक आकलन होते, तर हा अनुभव आणि नवीन कल्पना सुचणे उजव्या भागाचे काम आहे. एकाग्रता ध्यान हे डाव्या, तर पूर्ण भान उजव्या मेंदूला अधिक सक्रिय करते. सतत एकाग्रता ध्यान केल्याने सर्जनशीलता कमी होते, या सिद्धांताला हे संशोधन पुष्टी देत आहे. त्यामुळे श्वासावर लक्ष ठेवणे हे एकाग्रता ध्यान आणि संपूर्ण शरीरातील संवेदना, मनातील विचार यांचे पूर्णभान असा दोन्ही प्रकारचा सराव मेंदूचा समतोल विकास साधतो.

yashwel@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 12:08 am

Web Title: article on hemisphere of the brain abn 97
Next Stories
1 कुतूहल : अक्षय ऊर्जेचे विशाल स्रोत!
2 कुतूहल : पर्यावरणीय संतुलनाचा लगाम!
3 मनोवेध : गती/मतिमंदत्व
Just Now!
X