डॉ. यश वेलणकर

माणसाच्या मेंदूत विचारांशी संबंधित दोन व्यवस्था आहेत. त्यातील एका व्यवस्थेला डिफॉल्ट मोड नेटवर्क आणि दुसरीला एग्झिक्युटिव्ह फंक्शन नेटवर्क म्हणतात. आपल्या मनात विचार येत असतात त्या वेळी डिफॉल्ट मोड नेटवर्क सक्रिय असते आणि आपण विचार करीत असतो त्या वेळी एग्झिक्युटिव्ह फंक्शन नेटवर्क काम करीत असते. समस्या सोडवण्यासाठी विचार करणे, नियोजन, प्राधान्यक्रम ठरवणे ही मानवी मेंदूची एग्झिक्युटिव्ह फंक्शन्स – व्यवस्थापकीय कार्ये – आहेत. भावनांचे नियमन, विचारांची लवचीकता, लक्ष कुठे द्यायचे याचे नियंत्रण हीदेखील व्यवस्थापकीय काय्रे आहेत. ध्यानाच्या सरावाने ही कार्ये विकसित होतात. कारण आपण लक्ष कोठे न्यायचे हे ठरवून तेथे लक्ष नेत असतो त्या वेळी मेंदूतील ‘व्यवस्थापकीय कार्य करणाऱ्या भागां’ना सक्रिय करीत असतो. शरीरातील स्नायूंना काम दिले की ते विकसित होतात. हेच तत्त्व मेंदूतही असते. मेंदूच्या ज्या भागाला आपण काम देतो तेथील पेशींच्या जोडण्या वाढतात, तो भाग अधिक कार्यक्षम होतो. मात्र सतत ठरावीक स्नायूंना काम दिले तर ते थकतात. पुढे वाकून सतत काम केले तर कंबर दुखू लागते. मेंदूतीलदेखील ठरावीक भागाला सतत कार्यमग्न ठेवले तर थकवा येतो. दिवसभर खुर्चीत बसून काम करायचे असल्यास अधूनमधून उभे राहून स्नायूंना ताणले तर शारीरिक तणाव कमी होतो. तसेच मेंदूला सतत एकच काम न देता त्याचे काम बदलत राहायला हवे. म्हणजे सतत विचार करीत न राहता अधूनमधून लक्ष श्वासावर, शरीरावर न्यायला हवे. काही वेळ कोणत्याच गोष्टींचा विचार न करता मनात आपोआप कोणते विचार येत आहेत हे पाहायला हवे. मनाला असे मोकळे सोडतो त्या वेळी मेंदूतील डिफॉल्ट मोड नेटवर्क काम करू लागते. हे सक्रिय असते त्या वेळी नवीन कल्पना सुचू शकतात. मात्र हाच भाग अधिक सक्रिय असेल तर आपण विचारात भरकटलो आहोत याचेही भान राहत नाही. असे भान येणे हे व्यवस्थापकीय कार्य आहे.  शरीरातील आणि मेंदूतील विविध भागांना आलटून-पालटून काम आणि विश्रांती देणे हे सजगता असेल तरच शक्य होते. लक्ष पुन:पुन्हा वर्तमानात आणण्याच्या सरावाने सजगता वाढते. ती वाढली की मेंदूतील दोन्ही नेटवर्कना काम आणि विश्रांती देणे शक्य होते. आत्मभान म्हणजे इनसाइट असलेली प्रत्येक व्यक्ती असा सराव करू शकते.

yashwel@gmail.com