उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधांतील २४० उत्तर व ३८० दक्षिण अक्षांशादरम्यान असलेल्या तब्बल १२३हून अधिक देशांत आणि प्रामुख्याने दक्षिण आशियाई देशांत खाऱ्या पाण्यात वाढणाऱ्या खारफुटी वनस्पती आढळतात. भारतात सुंदरबन हे जगातील सर्वात मोठे खारफुटी जंगल असून त्याला युनेस्कोने ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून जाहीर केले आहे.

nashik, Adulterated Goods, Worth Rs 54 thousand, Adulterated Goods Seized, Adulterated prasad, Trimbakeshwar Adulterated prasad, nashik news,
त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त
Lok Sabha Election, Lok Sabha Election 2024,
डोके ठिकाणावर ठेवून मतदान कराल ना?
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
Increase in prices of fruits and vegetables due to decrease in arrivals
खिशावर आर्थिक ताण; पालेभाज्या, फळभाज्यांच्या दरात वाढ

या वनस्पती दलदलीत वाढत असल्याने कमी प्राणवायूशी जुळवून घेण्यासाठी हवेत वाढणारी आगंतुक मुळे, खाऱ्या पाण्याचा सामना करण्यासाठी जाड पाने व त्यावरील ‘क्षार-ग्रंथी’, चिखलावर वाढण्यासाठी आडवी जाणारी मुळे, वनस्पतीवर्गातील असूनही बीजांकुरण झाडावर होऊन अंकुरासकट बीज चिखलात पडून रुजणे; या व अशा अनेक वैशिष्टय़ांमुळे खारफुटी इतर सजीवांपेक्षा वेगळ्या आहेतच, परंतु समस्त पर्यावरण राखण्याची क्षमता बाळगतात.

खारफुटींच्या मुळांच्या जटिल जाळ्यामुळे अनेक जलचरांसाठी उत्तम संरक्षित अधिवास मिळतो. चिखलातील पोषणद्रव्ये शोषण्याची खास व्यवस्था असल्याने मासे, कोळंबी, खेकडे, पाणपक्षी, इ. सजीव अंडी घालण्यासाठी व अन्नग्रहणासाठी या जंगलात येतात. यामुळे जैवविविधता जास्त आढळते. यांची पाने, फुले, फळे मनुष्यप्राण्यांसकट अनेकांची आवडते खाद्य आहेत. मध, राळ, गोंद ही उत्पादने खारफुटी देतात. बहुतांश झाडे औषधी आहेत. इमारती व जळाऊ लाकूड यांपासून मिळते. यामुळे खारफुटीची जंगले पर्यावरणातील अनेक घटकांचा ‘पोशिंदा’ ठरतात.

विविध प्रकारची मुळे पोषकद्रव्ये शोषण्यासोबत, औद्योगिक व घरगुती प्रदूषकेदेखील काही प्रमाणात शोषून घेतात. त्यामुळे पर्यावरण प्रदूषणमुक्त ठेवण्याचे काम पार पाडतात. माणसाने औद्योगिकीकरण, शहरीकरण, शेती यासाठी खारफुटीची अमर्याद कत्तल केली. खाजणातील हे वृक्ष समुद्र/ खाडी/ नदीमुख आणि जमीन यांमध्ये भिंत बनतात. पूर, त्सुनामी याचे आक्रमण थोपवून धरतात. साधारण ५०० मीटरचा खारफुटी जंगलाचा पट्टा, विध्वंसक लाटा ९९ टक्क्यांपर्यंत कमी करू शकतात. २६ जुलै २००५ रोजी मुंबई महानगर टापूत झालेल्या विध्वंसाचे प्रमुख कारण त्या भागातील खारफुटीची केलेली नृशंस तोड हे होते. ही वने शहरासाठी खऱ्या अर्थाने ‘हरित भिंती’ आहेत.

हरित वायुप्रदूषण हा पर्यावरणातील सद्य:स्थितीतील मोठा प्रश्न आहे. येथेही या वनस्पती पर्यावरणाच्या मदतीला धावून येतात. जमिनीवरील वनांच्या तुलनेत संपूर्ण पृथ्वीवर खारफुटी वनांचे प्रमाण एक टक्क्याहूनही कमी आहे. परंतु हरित वायू शोषण्याची त्यांची क्षमता एकुणाच्या १० टक्के एवढी आहे. त्या दृष्टीनेही जागतिक पर्यावरण रक्षणासाठी ही नैसर्गिक साधनसंपदा ‘हरित योद्धा’ ठरते. खारफुटी जंगले पर्यावरणासाठी वरदान आहेत, त्यांची जोपासना करायलाच हवी.

– डॉ. मनोज बोरकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org