उत्कट इच्छा आणि अपार मेहनत करण्याची जिद्द असेल, तर ठरवलेले ध्येय निश्चितच गाठता येते. प्रदीप सांगवान हा तरुण हे त्याचे उदाहरण. गिर्यारोहणाची प्रचंड आवड असणारा प्रदीप पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर हिमालयात गिर्यारोहणासाठी गेला आणि तिथे प्लास्टिकचा कचरा पाहून अस्वस्थ झाला. इथेच त्यास त्याचे ध्येय गवसले.. ‘कचरामुक्त हिमालया’चे!

हरियाणामध्ये जन्मलेल्या प्रदीपचे वडील सैन्यात होते. प्रदीपनेही सैन्यात जावे अशी वडिलांची इच्छा. परंतु गिर्यारोहणाची आवड असणाऱ्या प्रदीपला भारतातील पर्वतराजी साद घालत होती. या आवडीमुळेच, घरच्यांचा रोष पत्करूनही, प्रदीपने गिर्यारोहक होण्याचा निर्णय घेतला. मग घरातून निघालेला प्रदीप पोहोचला ते थेट मनालीला. इथे उपजीविकेसाठी त्याने रोहतांग पास मार्गावरील कोठी गावात एक कॅफे उघडला. पण हिमालयातील वाढत्या पर्यटक-गर्दीमुळे होणाऱ्या प्लास्टिकच्या कचऱ्याची तीव्रता पाहून प्रदीप हादरून गेला. हिमालयाला त्याचे सौंदर्य पुन्हा मिळवून देण्याची ध्येयगाठ त्याने मनाशी बांधली आणि त्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली.

त्याने ‘कचरामुक्त हिमालय’ ही मोहीम सुरू केली. पर्यटकांच्या मागोमाग तो हिमालयावर जात असे. त्यांनी टाकलेल्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, बिस्कीट-वेफर्सची आवरणे आणि अन्य प्लास्टिकचा कचरा तो उचलू लागला. सुरुवातीला पर्यटक आणि स्थानिक रहिवासी त्याच्या या कामाची चेष्टा करत. त्याला ‘भंगारवाला’ म्हणून हिणवत. परंतु याकडे दुर्लक्ष करत त्याने त्याचे काम सुरूच ठेवले. बघता बघता तीन वर्षांत त्याने एकटय़ाने पर्यटकांनी टाकलेला जवळपास पाच लाख किलो प्लास्टिक कचरा पहाडांवरून खाली आणला. तो करत असलेल्या या कामाचे स्वरूप ध्यानात येऊन स्थानिकांच्या मनात त्याच्याविषयी आदर निर्माण झाला. पर्यटकही त्याचे कौतुक करू लागले.

ही स्वच्छता मोहीम व्यापकपणे राबवण्यासाठी त्याला आता सहकाऱ्यांची गरज होती. यासाठी त्याने २०१६ मध्ये ‘द हीलिंग हिमालय फाऊंडेशन’ नावाची संस्था सुरू केली. पर्यावरण संवर्धनासाठी अनेक स्वयंसेवक या संस्थेत सहभागी होऊ लागले. त्यांच्या स्वच्छताकेंद्री गिर्यारोहण मोहिमांमधून जमा झालेला कचरा पुनप्र्रक्रियेसाठी पाठवला जातो. तिथे प्लास्टिकच्या कचऱ्यातून निर्माण होणारी वीज आसपासच्या खेडय़ांना मिळू लागली. यामुळे आता डोंगर स्वच्छ होऊ लागलेत आणि आसपासच्या गावांना प्रकाश मिळू लागला आहे. हिमालयावर जाणाऱ्या प्रत्येक पर्यटकाने खाली येताना डोंगरावरचा कचराही बरोबर आणला तर प्रदीपचे ‘कचरामुक्त हिमालया’चे ध्येय लवकरच साधले जाईल, हे निश्चित!

– मनीष चंद्रशेखर वाघ

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org