छत्तीसगढच्या रायगढ परिसरात पर्यावरणविषयक सगळेच नियम धाब्यावर बसवून सुरू असणाऱ्या वा सुरू होणाऱ्या औद्योगिकीकरणाला विरोध करण्याचे काम रमेश अग्रवाल गेल्या अडीच दशकांपासून करताहेत. अग्रवाल आणि त्यांच्या साथीदारांच्या आंदोलनाचा परिपाक म्हणूनच, तीन बडय़ा उद्योगसमूहांना रायगढमध्ये उद्योग सुरू करण्यास वा वाढवण्यास परवानगी मिळू शकलेली नाही.
रायगढ परिसरातल्या अवैध कोळसा खाणकामाविरोधातील गावकऱ्यांच्या आंदोलनाला अग्रवाल यांनी बळ दिले. या लढय़ामुळेच, देशातील एका नामांकित कंपनीचा पर्यावरणीय परिणाम करू शकणारा प्रस्तावित कोळसा प्रकल्प उभा राहू शकला नाही. त्यामुळे कोळसामाफियांच्या डोळ्यांत खुपणाऱ्या अग्रवाल यांच्यावर अनेकदा जीवघेणे हल्लेही झाले. यातल्या एका हल्ल्यात तर त्यांना मृत्यूशी झुंज द्यावी लागली. त्यांचे प्राण वाचले, पण दोन्ही पाय कायमचे निकामी झाले.
नव्वदच्या दशकात साक्षरतेविषयी जनजागृती करणाऱ्या अग्रवाल यांनी २००५ साली ‘जन चेतना मंच’ या संस्थेच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली. ते एक इंटरनेट कॅफे चालवतात. त्यामुळे माहिती व तंत्रज्ञानाचा स्थानिक पातळीवर पर्यावरण संरक्षणासाठी पुरेपूर उपयोग त्यांनी करून घेतला. त्या दृष्टीने जनजागृती मोहीमही सुरू केली. आत्तापर्यंत एका बडय़ा कोळसा खाण कंपनीविरुद्धच्या खटल्यासह तीन महत्त्वाच्या खटल्यांत न्यायालयाने अग्रवाल यांच्या बाजूने निकाल दिला आहे. आणखी सात प्रकरणांत अग्रवाल यांचा लढा न्यायालयात सुरू आहे.
कुरकुट नदीवरील धरणाविरोधातही अग्रवाल यांनी लढा दिला. याचा परिणाम म्हणून प्रशासनापासून सत्ताधाऱ्यांपर्यंतची मंडळी या प्रकल्पाबाबत ग्रामस्थांशी चर्चा करती झाली आणि ग्रामस्थांना बऱ्याच सुविधाही पुरवाव्या लागल्या. अग्रवाल यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे या भागातील अनेक ‘मेगा’ प्रकल्पांच्या गैरकारभारांविरोधात पुराव्यानिशी तक्रारी केल्या. त्यामुळे न्यायाधिकरणाने संबंधित कंपनीला दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. जंगल भागात उभ्या राहणाऱ्या उद्योगांचा वन्यजीवांवर होणाऱ्या दुष्परिणामांबद्दलही अग्रवाल यांनी आवाज उठवला.
छत्तीसगढमध्ये अवैध उत्खनन रोखण्यासाठी सरकारच्या भूमिकेबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले. इतकेच काय, पण अग्रवाल यांच्यासारख्या लढाऊ कार्यकर्त्यांना सरकार नीट सुरक्षाही पुरवू शकले नाही. सगळी व्यवस्थाच विरोधात असतानाही, अग्रवाल यांनी संघर्ष सुरूच ठेवला. निसर्गाचा ऱ्हास थांबविणारी अग्रवाल यांची ही बहुमोल कामगिरी नक्कीच प्रेरणादायी आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन २०१४ साली त्यांना ‘गोल्डमन फाऊंडेशन’तर्फे अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या ‘द गोल्डमन एन्व्हायर्नमेंटल प्राइझ’ने गौरवण्यात आले.
– मनीष चंद्रशेखर वाघ
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org