एक मीटर अगदी अचूकपणे मोजायचे असतील तर? आपण मीटर किंवा सेंटिमीटर मोजण्यासाठी पट्टीचा वापर करतो. पण आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं की बऱ्याचदा पट्टय़ा-पट्टय़ांवरच्या खुणा-खुणांमध्ये अगदी सूक्ष्म फरक असतो. एरवी ठीक आहे, पण कधी लांबीचं अचूक मोजमापन करायचं झालं तर, नेमकी कोणती पट्टी ‘अचूक’ म्हणून वापरायची, असा प्रश्न पडू शकतो. यावर उपाय म्हणून, अनेक वैज्ञानिकांनी गेली कित्येक वर्षे, चर्चा करून आणि संशोधन करून, काही एकके प्रमाणित केली. त्यापैकी लांबीचं जास्तीत जास्त अचूक परिमाण सांगणाऱ्या काही पट्टय़ा तयार केल्या गेल्या. त्यातल्या काही पॅरिसमध्ये तर काही अमेरिकेमध्ये स्थापन केल्या आहेत. या पट्टय़ा प्लॅटिनम आणि इरिडिअम या संमिश्रापासून बनवल्या आहेत. इरिडिअम हा धातू प्लॅटिनमच्या कुटुंबातला असला तरी तो प्लॅटिनमपेक्षा जास्त घनता असलेला आहे. त्याशिवाय तो पूर्णपणे गंजरोधक आहे. कोणत्याही आम्ल किंवा आम्लारीचा त्याच्यावर परिणाम होत नाही. आणि याच कारणांसाठी त्याचा वापर, प्रमाणित अचूक पट्टी तयार करण्यासाठी केला गेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रति घन सेंटीमीटर २० पेक्षाही जास्त (म्हणजे लोखंडापेक्षा जवळजवळ अडीचपट) घनता असलेलं हे मूलद्रव्य.. इरिडिअम! ते इतकं ‘कठीण’ आहे की त्याला ठोकून त्याचा पत्राही करता येत नाही. त्यातच त्याला वितळवणंही अत्यंत अवघड!! सन १८६० मध्ये हेन्री आणि ज्यूल्स या दोन वैज्ञानिकांनी एक किलो इरिडिअम वितळवण्यासाठी तब्बल ३०० लिटर एवढा शुद्ध ऑक्सिजन आणि शुद्ध हायड्रोजन जाळला होता. इरिडिअमला ठोकणं आणि वितळवणं हे महा-कर्मकठीण असल्यामुळे, त्याचा व्यवहारात फारसा उपयोग होणं, जरा दुरापास्तच होतं.

पण १८३४ च्या सुमाराला जॉन हॉकिन्स हा उत्तम दर्जाचं, अगदी अणकुचीदार आणि कठीण असं फाऊंटन पेनाचं निब तयार करत होता. पण त्याकरता त्याला हवा तसा धातू मिळत नव्हता. अखेरीस ‘इरिडिअम’ मदतीला धावून आलं आणि त्याने ‘इरिडिअम’चं निब असलेलं सोन्याचं पेन तयार केलं. पण एकूणच निसर्गत: ‘इरिडिअम’चा आढळ कमी आणि व्यवहारात उपयोगही कमी. त्यामुळेच ते ‘दुर्मीळ’ या विशेषणासाठी पात्र! संपूर्ण जगभरात, एका वर्षांत, फक्त तीन किलो ‘इरिडिअम’ शुद्ध करून वापरलं जातं.

– डॉ. मानसी राजाध्यक्ष , मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Facts about iridium
First published on: 19-09-2018 at 01:48 IST