टँटॅलम धातू हा अढळ धातू समजला जातो, म्हणजे त्याच्यावर उच्च तापमान किंवा विविध रसायनांची मात्रा चालत नाही. ७३ अणुक्रमांक आणि १८१ अणू वस्तुमानांक असलेला हा धातू अतिशय कठीण त्याचबरोबर चकाकणारा, बारीक तारा काढता येणारा असा अतिशय उपयुक्त धातू आहे!

स्वीडनमधील उप्पास्ला विद्यापीठात अ‍ॅण्डर्स एकबर्ग या शास्त्रज्ञाने १८०२ साली त्याचा प्रथम शोध लावला. परंतु पुढे गुणधर्मात अतिशय साधम्र्य असलेल्या निओबिअमबरोबर त्याची तुलना केली गेली व शास्त्रज्ञांना त्यावर पुष्कळ काम करावे लागले. शेवटी १९०३ मध्ये वर्नर फॉन बोल्टनने तो शुद्ध स्वरूपात मिळवला. अशा या धातूचे नाव ग्रीक पुराणातील टँटॅलस (Tantalus) या खलपुरुषावरून ठेवले गेले. हे नाव ठेवण्यामागचे कारण म्हणजे त्याने त्याच्या शोधकर्त्यांना पुष्कळ छळले.

टँटॅलसची कथा फारच मजेशीर आहे. ग्रीक पुराणात झेऊसचा मुलगा व फ्रिजियाचा राजा टँटॅलस अतिशय दुष्ट समजला जात असे. त्याला असा शाप होता की तो गुडघाभर पाण्यात उभा असेल आणि डोक्यावरच्या झाडावर अति चविष्ट असे फळ असेल. तहान लागली म्हणून खाली वाकला तर पाण्याची पातळी कमी-कमी होत जायची म्हणजे पाणी मिळणं अशक्य. वरच्या फळाला हात लावायचा प्रयत्न केला तर फांद्या वर वर जाऊन फळ काही हाती यायचे नाही अशी ती शिक्षा. त्यावरूनच टँटॅलायिझग (Tantalising) हा इंग्रजी शब्द आला आहे. शास्त्रज्ञांच्या मते या धातूनेसुद्धा संशोधन करताना त्यांना असेच छळले म्हणून अ‍ॅण्डर्स एकबर्गने त्याचे नामकरण टँटॅलम असे केले.

पृथ्वीच्या पृष्ठभागावर १.७ पीपीएम इतकाच हा धातू आढळतो. कोल्टन (Coltan) नावाच्या धातुकापासून टँटॅलमची निर्मिती केली जाते. जगातील २० टक्के टँटॅलम एकटय़ा ब्राझील देशामधून येते. हे धातुक आफ्रिकेतील काँगो भागात मिळते. असं म्हटलं जातं की;  काँगोतील मोठय़ा युद्धात टँटलमच्या धातुकामुळे आर्थिक साहाय्य मिळाले. हे अभूतपूर्व युद्ध ५४ लाख लोकांचा बळी घेऊन गेले.

– डॉ. कविता रेगे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org