लॅन्थनाइड श्रेणीच्या मध्यभागी असलेल्या टर्बिअमला दुर्मीळ म्हणणे चुकीचे होईल कारण तो चांदी, सोने आणि पाऱ्यापेक्षा जास्त प्रमाणात आढळतो. पृथ्वीच्या कवचात आढळणाऱ्या विपुल खनिजात टर्बिअम ५५व्या क्रमांकावर आहे. चंदेरी राखाडी रंगाच्या या धातूवर कोरडय़ा हवेचा परिणाम होत नाही, परंतु पाण्याशी संपर्क आल्यास अत्यंत संथ गतीने क्रिया होते. तो सुरीने कापण्याइतपत मृदू आहे व त्याच्यापासून पातळ पत्रा व बारीक तार तयार करणे सोपे आहे. याची एकूण ३३ समस्थानिके आढळतात, त्यापैकी टर्बिअम-१५९ सर्वात स्थिर असून त्याचा अर्धायुष्य कालावधी १८० वर्षे एवढा आहे.

सामान्यत: टर्बिअम आणि त्याच्या संयुगांचा वापर फॉस्फर तयार करण्यासाठी केला जातो, दूरचित्रवाणी संचाच्या पडद्याच्या मागच्या बाजूस वेगवेगळ्या फॉस्फर पदार्थाचे थर दिलेले असतात. फॉस्फरवर इलेक्ट्रॉन्सचा मारा होताच वेगवेगळे रंग निर्माण होतात. फॉस्फरमध्ये टर्बिअमच्या वापरामुळे हिरवा रंग तयार होतो. तसेच क्ष-किरणाच्या पडद्यावरील चित्र स्पष्ट करण्यासाठी टर्बिअमचा उपयोग होतो. मक्र्युरी लॅम्प, लघु ऊर्जेचे दिवे, इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या अर्धसंवाहकात कॅल्शिअम फ्लोराइडचे डोपिंग करण्यासाठी टर्बिअम वापरतात. पुन्हा लिहिता येण्यासारख्या कॉम्पॅक्ट डिस्कसाठी पहिल्यांदा टर्बिअमचा उपयोग केला गेला.

टर्बिअमचा वापर इंधन घटांमध्ये केला जातो. इंधन घट म्हणजे अशी प्रणाली ज्यात रासायनिक क्रिया घडवून वीज तयार केली जाते. भविष्यात सर्वत्र विजेचा मुख्य स्रोत इंधन घट असण्याची शक्यता असून टर्बिअम-इंधन घट उच्च तापमानाला परिणामकारकरीत्या काम करतात.

टर्बिअम – १४९ किरणोत्सारी समस्थानिक असून त्याचा वापर वैद्यकीय क्षेत्रात कर्करोगाच्या पेशी मारण्यासाठी केला जातो. यातून उत्सर्जित झालेले किरण जास्त दूरवर जात नसल्यामुळे निरोगी पेशींना इजा होत नाही म्हणून इतर किरणोत्सारी मूलद्रव्यापेक्षा टर्बिअम-१४९ला प्राधान्य दिले जाते.

टर्बिअममुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांविषयी विशेष माहिती नसल्यामुळे, सुरक्षिततेच्या कारणास्तव असलेल्या धोरणांनुसार त्याला अत्यंत विषारी असल्याचे मानून त्याच्याशी संपर्क मात्र टाळावा.

– मीनल टिपणीस, 

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org